नाव बदलून 'आबेर गुलाल' होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाणी कपूर आणि फवाद खानचा हा चित्रपट या महिन्यात जगभरात रिलीज होणार आहे. 'बिज एशिया लाइव' या वेबसाइटवर छापलेल्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. पण, निर्माते कोणताही धोका घेऊ इच्छित नाहीत, कारण या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. त्यामुळे त्यांनी दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३' या चित्रपटासारखीच योजना आखली आहे. जसा 'सरदारजी ३' हा चित्रपट भारतात सोडून जगभरात रिलीज झाला होता, त्याच प्रकारे 'अबीर गुलाल' सुद्धा भारताव्यतिरिक्त इतर देशात रिलीज होण्याची शक्यता आहे. 'सरदारजी ३' या चित्रपटाने पाकिस्तानमध्येही चांगली कमाई केली होती.
advertisement
रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्पेलिंगमध्येही बदल केला आहे. आधी 'Abir Gulaal' असं नाव होतं, आता ते 'Aabeer Gulaal' असं करण्यात आलं आहे. हा चित्रपट २९ ऑगस्टला जगभरात रिलीज होईल, पण तो भारतात रिलीज होणार नाही, असं म्हटलं जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढला होता रोष
यावर्षी एप्रिलमध्ये काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. या हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामुळे लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे फवाद खानच्या या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.