अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या कुटुंब कीर्तन या नाटकात काम करत आहेत. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि तन्वी मुंडले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचा प्रयोग नुकताच ठाण्यात पार पडला. ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग रंगला. या प्रयोगाच्या नंतर वंदना गुप्ते यांना एक चाहता भेटण्यासाठी आला. तो अनुभव त्यांनी पोस्टमधून शेअर केली आहे.
advertisement
( डोळ्यात सुडाची आग, खुनशी वृत्ती; अभिनेत्री प्रिया बेर्डेचं TVवर कमबॅक, धडकी भरवणारा लुक समोर )
वंदना गुप्ते यांनी चाहत्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "आज ठाण्याला 'गडकरी रंगायतन'ला कुटुंब कीर्तन नाटकाचा प्रयोग होता. मेकअप रूममधे एक गृहस्थ माझी सही घ्यायची म्हणून भेटायला आले. त्यांनी एका 2 बाय 4 च्या टाइल वर माझी सही घेतली."
"मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून मी कारण विचारलं. ते म्हणाले 'गडकरी रंगायतन हे ठाण्याच वैभव आहे. जिथे अनेक महान कलाकार आपली कला सादर करत आले. त्या रंगमंदिराचे नूतनीकरण करताना मी त्यातल्या फरश्या 3-4 गोणी भरून घरी घेऊन आलो. मी माझ्या आवडत्या कलाकारांची सही ह्यावर घेऊन ठेवतो. माझ्या घराची एक भिंत ह्या साह्यांनी भरलेली असेल. आणि ती माझ्यासाठी एक ऐतिहासिक, मौल्यवान आठवण असेल."
"मला खूप गलबलून आलं ते ऐकून. किती प्रेम करतात आमच्या कलेवर लोक. खरं तर असे प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही रंगमंचावर टिकून आहोत. बालगंधर्व उगाच नाही प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत."