पुणे : बिगबॉस मराठी फेम सूरज चव्हाण लवकरच आपला पहिला चित्रपट ‘झापुक झुपुक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. ट्रेलरचं अनावरण अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकल18 सोबत बोलताना सूरजने चित्रपट आणि करियरबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
advertisement
‘झापुक झुपुक’ या सिनेमात सूरज एका हटके भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला असून, बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या संधीबद्दल बोलताना सूरज म्हणाला, “केदार सरांनी मला हा मोठा प्लॅटफॉर्म दिला, यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. बिग बॉसच्या घरात असताना ‘झापुक झुपुक’ हे गाणं माझ्या स्टाईलमध्ये हिट झालं होतं आणि तेच नाव असलेला हा चित्रपट आता साकारतो आहे, याचा आनंद वेगळाच आहे.”
‘सा रे ग म प’मधून तिसऱ्या फेरीत बाहेर, आख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घालतोय हा आवाज!
साउथ इंड्स्ट्रीत काम करायचंय
“चित्रपट बनवणं हे रील्स बनवण्याइतकं सोपं नसतं. बऱ्याच अडचणी आल्या पण त्या पार करत मी मनापासून काम केलं आहे,” असं सूरजनं सांगितलं. तसेच आता घर झालं आहे. चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि लवकरच तो प्रदर्शित देखील होतोय. आता आगामी काळात काय ध्येय असणार आहे? याबाबत सांगताना “साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याची आपली इच्छा आहे,” असं त्यानं सांगितलं.
दरम्यान, ‘झापुक झुपुक’ हा सिनेमा फुल धमाल, कॉमेडी, राडा, प्रेमकथा आणि भरपूर एंटरटेन्मेंटने भरलेला आहे. सूरजच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. बिग बॉसच्या मंचावरून थेट रुपेरी पडद्यावर झेप घेतलेल्या सूरजसाठी हा एक मोठा टप्पा आहे आणि त्याच्या यशाची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.