घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण गोव्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. खासगी बस रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या तंबूत शिरल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी कामगारांकडून करण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हा अपघात झाला आहे. शनिवारी रात्री साडेआकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कामावरून परत येऊन मजूर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या तंबूत झोपले होते. याचवेळी हा अपघात घडला आहे. आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान यातील एका मजुराकडून असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा हा अपघात घडला तेव्हा हा चालक दारूच्या नशेत होता. ही घटना कोणाला सांगितली तर तुम्हालाही जीवे मारू अशी या चालकानं तेथील इतर मजुरांना धमकी दिली. रुपेंद्र कुमार माथूर असं या मजुराचं नाव आहे. या अपघातामध्ये त्यांनी आपल्या काका रमेश माथूर आणि भाऊ अनिल माथूर यांना गमावलं आहे. तर रुपेंद्र कुमार हे देखील याच तंबूमध्ये राहात होते. फोनवर बोलण्यासाठी ते बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला.