दोघांनी मिळून काढला काटा
चिपळूण पोलीस यंत्रणा कामाला लागली. युद्धपातळीवर तपास सुरू झाला आणि लवकरच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. संशयाच्या सुईने एका तरुणाकडे निर्देश केला. त्याचे नाव जयेश भालचंद्र गोंधळेकर... पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. पण, या गुन्ह्यात तो एकटा नव्हता. त्याचा मित्र आणि या कटातील साथीदार रवी कांबळे अद्याप फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती.
advertisement
टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एजंट
आरोपी जयेश गोंधळेकर हा मूळचा चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातीलच होता, म्हणजेच तो जोशींच्या ओळखीचा होता. तो टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करत होता. याच कामामुळे तो जोशींच्या संपर्कात आला होता. जोशी यांनी त्याच्या माध्यमातून अनेकदा प्रवास केला होता, त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. पण, हा विश्वासच जीवघेणा ठरला.
लालसेपोटी रचला हत्येचा कट
जोशी या एकट्या राहत होत्या आणि त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील, असा जयेशचा समज झाला. याच लालसेपोटी त्याने आपल्या मित्रासह त्यांच्या हत्येचा कट रचला. त्यांच्या तोंडात कपड्याचे गोळे कोंबून, तोंड आणि मान दाबून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे हात-पायही बांधण्यात आले होते. हत्येनंतर जयेशने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला.
सीसीटीव्ही फुटेजचा डीवीआर गायब
आरोपीने जोशींच्या घरातून सीसीटीव्ही फुटेजचा डीवीआर आणि कॉम्प्युटरमधील हार्डडिस्क गायब केली. त्याला कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असल्याने त्याने हे केले होते. मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. जोशींच्या घरात पोलिसांना एक जुने प्रवासाचे तिकीट मिळाले, ज्यावर 'जयेश' असे नाव होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय काय दिसलं?
दरम्यान, घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो जोशींच्या घराच्या दिशेने जाताना दिसला होता. या पुराव्यांवरून आणि अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
