हिवाळ्यात अत्यधिक थंडीमुळे शरीरातील अग्नी मंदावतो. आयुर्वेदानुसार, पोटातील अग्नी विझला की पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. भूक लागते पण अन्न पचत नाही ही स्थिती नेहमी दिसून येते. त्यामुळे सकाळच्या वेळेत अग्नी वर्धन करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे आवश्यक असते. हे उपाय पचन सुरळीत करण्यासोबतच शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्याचे काम करतात. इंस्टाग्रामवर डॉ. ऋचा मेहंदळे पै यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. ऋचा यांच्यामते, अग्नी वाढवण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे सुंठ पावडर. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात थोडी सुंठ मिसळून घेतल्याने पोटातील अग्नीचे वर्धन होते. सुंठ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, तसेच गॅसेस आणि वात कमी करते. याशिवाय जिऱ्याचे पाणीही उत्तम पचनवर्धक मानले जाते. सकाळी उठल्यावर एक ग्लास जिऱ्याचे कोमट पाणी घेतल्यास पोट हलके होते आणि पचनाची शक्ती वाढते.
गायीचे तूप हेही अग्नी वर्धनासाठी उत्तम मानले जाते. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा गायीचे तूप मिसळून घेणे हे आयुर्वेदातील प्रभावी तत्त्व आहे. जसे हवनकुंडातील अग्नी वाढवण्यासाठी तुपाची आहुती देतात, तसेच सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पचनाग्नी मजबूत होतो. यामुळे पचन सुधारते, पित्त शांत होते आणि सतत होणाऱ्या अॅसिडिटीला आराम मिळतो.
हे सर्व उपाय नियमितपणे केल्यास हिवाळ्यात होणारे सामान्य पचनाचे त्रास कमी होतात. पोट हलके राहते, भूक योग्य वेळी लागते आणि अन्न नीट पचते. थोड्या आयुर्वेदिक सवयी अंगीकारल्यास हिवाळ्यातील सुस्ती, जडपणा, अपचन आणि अॅसिडिटी सहज नियंत्रणात राहते. निरोगी पचन म्हणजे निरोगी शरीर, हे लक्षात घेऊन हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या दैनंदिन जीवनात हे उपाय समाविष्ट केले तर निश्चितच चांगला बदल जाणवतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
