मुंबई : जेवणात तोंडी लावायला वडी असेल तर 2 घास जरा जास्त जातात. आपण अळूवडी, सुरळीची वडी, पालक वडी, कोबीची वडी बनवतो. कोथिंबीर वडीसुद्धा अनेकजणांना आवडते. या वड्या ताज्या असताना चांगल्या लागतातच पण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची चव बराच वेळ जशीच्या तशी राहते. मग आपण हवं तेव्हा बाहेर काढून कोथिंबीर वड्या कुरकुरीत तळू शकतो.
advertisement
श्रावण महिन्यात मांसाहार करत नसल्यानं आपण शाकाहारी पदार्थांचे वेगवगळे बेत करतो. शिवाय सणावाराच्या निमित्तानं, श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास कोथिंबीर वडी कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. पावसाचे दिवस आहेत, चहासोबत आपण या खमंग वड्यांचा आस्वाद घेऊ शकता.
साहित्य : स्वच्छ धुवून बारीक चिरलेली 1 जुडी कोथिंबीर, 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, ओवा, मसाला, थोडं पाणी, मिरची, आलं-लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ.
कृती : बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, मसाला, ओवा, मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घाला. यात पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. मग मिश्रणाचे 2 गोळे करून घ्या. चाळणी किंवा तुमच्याकडे असलेल्या भांड्याला आतून तेल लावा. त्यात हे गोळे ठेवा. तेल लावल्यानं गोळे भांड्याला चिकटणार नाहीत. आता कुकरमध्ये थोडं पाणी घ्या, त्यावर गोळे ठेवलेली चाळणी किंवा भांड ठेवा. कुकरला शिट्टी येऊद्या. दोन्ही गोळे वाफवून शिजू द्या. साधारण 20 मिनिटं कुकर गॅसवर ठेवा.
कोथिंबीर वाड्यांचं पीठ कुकरमध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून थोडं थंड होऊद्या. थंड झाल्यावर दोन्ही गोळे बाहेर काढून त्याच्या वड्या पाडा. या वड्या तेलात फ्राय करून घ्या. फ्राय झाल्यानंतर छान कुरकुरीत, खुसखुशीत कोथिंबीर वड्या आपण सर्व्ह करू शकता.





