मुंबई : उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वड्यांचा बेत केला जातो. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या दिवशी उपवास पाळणार असाल तर साबुदाणे खिचडीची सोपी रेसिपी पाहूया. ज्यामुळे खिचडी चिकटही होणार नाही आणि कच्चीही राहणार नाही. गृहिणी छाया शिंदे यांनी ही खमंग साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी सांगितली आहे.
साबुदाणा खिचडीसाठी लागणारं साहित्य : पाव किलो साबुदाणे, 2 मोठे बटाटे, 2 चमचे तेल, 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी.
advertisement
हेही वाचा : जेवण बनवल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? 99 टक्के लोक करतात चूक, ICMR ने केलं मार्गदर्शन
सर्वात आधी एका कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्यावं. त्यात बटाट्यांचे बारीक काप आणि चवीनुसार मीठ घालावं. बटाटे परतल्यानंतर लगेच त्यावर वाफवण्यासाठी झाकण ठेवा. 2 मिनिटांनी त्यात बारीक चिरलेली मिरची घालून पुन्हा झाकण ठेवा. बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतर साबुदाणे घाला, त्यापाठोपाठ शेंगदाण्याचा कूटही अॅड करा आणि 3 ते 4 मिनिटं परतून घ्या. 5 मिनिटांच्या वाफेनंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं खिचडी परतावी. आता गरमागरम साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे. दह्यामध्ये साखर घालून त्यासोबत आपण ही खिचडी खाऊ शकता.
लक्षात घ्या, साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खुसखुशीत होण्यासाठी साबुदाणे व्यवस्थित भिजणं आवश्यक आहे. आपण आदल्या रात्री साबुदाणे भिजत ठेवू शकता. त्यासाठी साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे. मग अर्धा सेमी पाणी राहील अशा भांड्यात ते भिजवावे. यात जास्त पाणी पाणी घालू नये. रात्री शक्य नसेल, तर सकाळी किमान 3 तास साबुदाणे भिजायला हवे.