आजीने दाखवलेला बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत असा गावरान पारंपारिक पदार्थ... ज्यामध्ये बटाटे चिरण्याची पद्धतही वेगळी आहे. सामान्यपणे आपण बटाटाच्या उभ्या किंवा आडव्या फोडी करतो. यात बटाटा अख्खाच चिरायचा आहे. म्हणजे जसं आपण भरलेलं वांगं करतो, तसं पण वांग्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने हा बटाटा कापायचा आहे. आता फार वेळ न घालवता थेट कृतीकडेच जाऊयात.
advertisement
Dal Recipe Video : प्राचीन काळी डाळ कशी बनवायचे? 5000 वर्षे जुनी रेसिपी
साहित्य
बटाटे - 1 किलो
लसूण - 5 कांदे
जिरे - 2 चमचे
पांढरे तीळ - 2 चमचे
कोथिंबीर
लाल तिखट - 4 चमचे
हळद - एक चमचा
धनेपूड - एक चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कृती
बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते वेगळ्या पद्धतीने चिरायचे आहेत. बटाटा पूर्ण चिरायचा नाही. तर भरलेलं वांगं करताना चिरतो तसा आधी उभा चिरायचा आहे आणि तसाच नंतर आडवा चिरायचा आहे. कसा तो तुम्ही पुढे व्हिडीओमध्ये पाहू शकता. आता चिरलेले बटाटा काळे पडू नयेत म्हणून पाण्यात टाका. अशा पद्धतीने बटाटा चिरल्याने त्यात मसाला चांगला बसतो आणि तो नीट शिजतो.
Garlic Recipe Video : लसूण चटणी नेहमीच खाता ओ, आता ट्राय लसणीचा भुरका
आता जिरं, तीळ हलकं गरम करून जाडसर वाटून घ्या. लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्या. वाटलेलं जिरं, तीळ, लसूण, कोथिंबीर एकत्र करा. त्यात 4 चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक चमचा धनेपूड टाकून मिक्स करून घ्या. तेल टाकून पुन्हा मिक्स करा. पाणी बिलकुल वापरायचं नाही. म्हणजे प्रवासातही तुम्ही हा बटाटा नेलात तर खराब होणार नाही. वाटण कोरडं वाटलं तर पाण्याऐवजी तेलच घाला. आता हा मसाला बटाट्यात भरा. उभा आणि आडवा दोन्ही बाजूंनी कापलं आहे तिथं मसाला भरून घ्यायचं. तेलामुळे मसाला बटाट्यात चांगला चिकटून राहतो.
लोखंडी तवा घ्या, त्याला तेल लावून घ्या. त्यावर मसाले भरलेले बटाटे ठेवून घ्या. त्यावर उलटं केळीचं पान ठेवून झाकून घ्या. दुसरा तवा गॅसवर 5 मिनिटं गरम करून घ्या. त्यानंतर बटाटे ठेवलेला तवा गॅसवर ठेवा आणि आधी गरम केलेला तवा बटाटे असलेल्या तव्यावर उलटा ठेवा. म्हणजे दोन्ही बाजूंनी बटाटे चांगले शिजतात. थोड्यावेळाने बटाट्याची खालची बाजू भाजली की बटाटे परतून घ्या आणि दुसरी बाजूही भाजून घ्या.
गावरान- एक खरी चव या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लहान लहान बटाटे घ्यायचे म्हणजे मसाले चांगला भरतो आणि भाजले नीट जातात, अशी टीप देण्यात आली आहे. तुम्ही ही रेसिपी बनवून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
