सोलापूर - हाताला काम मिळत नसल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण निराशेचे जीवन जगत असतात. पण सोलापूर जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने निराश न होता स्वतःचा वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सदाशिव सुभाष म्हमाणे असं मोहोळ तालुक्यातील कोरवलीच्या तरुणाचं नाव असून त्यानं बी.सी.ए म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचं शिक्षण घेतलंय. आता वडापाव विक्रीतून तो चांगली कमाई करतोय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
25 वर्षीय सदाशिव म्हमाणे याने बीसीएचं शिक्षण घेतलं. बीसीएनंतर तो नोकरीच्या शोधात होता. परंतु, त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. तेव्हा त्यानं निराश न होता, दुसरा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सदाशिवने वडापाव विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो वडापाव विक्रीचा व्यवसाय करत आहे. मोहोळ - मंद्रूप बायपास येथील कोरवली गावात त्याचा वडापाव विक्रीचा स्टॉल आहे. 10 रुपये प्लेट या दराने तो वडापाव विक्री करत आहे. वडापावची चव उत्कृष्ट असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी खवय्यांची गर्दी असते.
एका एकरात पिकवलं पिवळं सोनं, 5 वर्षांपासून शेतकरी करतोय फायद्याची शेती, पाहा यशोगाथा Video
दिवसाला 400 वडापावची विक्री
या ठिकाणी भजी पाव, थंडगार पेय, चहा हे देखील या ठिकाणी मिळत आहे. तर दिवसाला 400 ते 500 वडापावची विक्री या ठिकाणी होत आहे. सर्व खर्च वजा करून महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांची कमाई सदाशिव करत आहे. तर वर्षाला 3 लाखांपर्यंत कमाई वडापाव विक्रीच्या माध्यमातून होतेय. तरुणांनी नोकरीच्या मागे न जाता घरच्यांशी चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे आणि कोणता ना कोणता व्यवसाय सुरू करावा. या निर्णयाचा नक्कीच फायदा मिळेल असा सल्ला सदाशिव तरुणांना देतो.