सोने गंजत नाही, पण दागिन्यांत मिसळलेले इतर धातू, धूळ-माती, त्वचेतील तेल आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स यामुळे त्याच्या पृष्ठभागावर थर तयार होतात. त्यामुळे दागिने पिवळ्या ऐवजी किंचित मळकट दिसू लागतात. विशेषतः रोज घालायची चैन, अंगठी आणि बाळी लवकर मळकट होतात.
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सर्वात सुरक्षित पद्धत..
घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी महागड्या केमिकल्सची गरज नसते. फक्त कोमट पाणी, लिक्विड डिशवॉश किंवा सौम्य साबण आणि एक मऊ ब्रश पुरेसा आहे. एका वाटीत कोमट पाणी घ्या आणि त्यात लिक्विड साबणाचे काही थेंब टाका. आता सोन्याचे दागिने 10 ते 15 मिनिटे या पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे मळ सैल होतो. त्यानंतर सॉफ्ट टूथब्रश किंवा मेकअप ब्रशने हलक्या हाताने दागिने स्वच्छ करा, विशेषतः जिथे डिझाइन किंवा जोड आहेत तिथे. जास्त जोर लावू नका, याची काळजी घ्या.
advertisement
योग्य पद्धतीने वाळवणेही तितकेच महत्त्वाचे
धुतल्यानंतर दागिने स्वच्छ पाण्याने नीट धुवा, जेणेकरून साबणाचा अंश राहणार नाही. त्यानंतर कोरड्या आणि मऊ सुती कापडाने हलक्या हाताने पुसा. दागिने पूर्णपणे वाळू द्या आणि मगच डब्यात ठेवा. ओलसर दागिने ठेवल्यास पुन्हा मळ साचू शकतो.
या गोष्टींपासून सोन्याचे दागिने दूर ठेवा
अनेकदा लोक टूथपेस्ट, बेकिंग सोडा किंवा केमिकल क्लिनरने सोने स्वच्छ करतात, जे हानिकारक ठरू शकते. यामुळे दागिन्यांची पॉलिश खराब होऊ शकते आणि नाजूक डिझाइन झिजू शकतात. तसेच दगड बसवलेल्या दागिन्यांवर या गोष्टी अजिबात वापरू नयेत.
किती वेळा स्वच्छता करावी?
तुम्ही दागिने रोज घालत असाल, तर महिन्यातून एकदा हलकी स्वच्छता पुरेशी आहे. जड दागिने वर्षातून 2-3 वेळा स्वच्छ केले तरी चालतात. खूप वेळा स्वच्छता करणे टाळा.
योग्य काळजी घेतल्यास वर्षानुवर्षे टिकते चमक
सोन्याचे दागिने नेहमी वेगवेगळ्या कापडात किंवा सॉफ्ट बॉक्समध्ये ठेवा. परफ्यूम, हेअरस्प्रे आणि लोशन लावल्यानंतरच दागिने घाला. झोपताना किंवा आंघोळ करताना दागिने काढणे अधिक चांगले ठरते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
