उन्हाळ्यात काहीवेळा पोट बिघडू शकतं. उन्हाळ्यात काकडीसारखे हायड्रेटिंग पदार्थ खाल्ल्यानं प्रकृती शांत राहते पण मसालेदार पदार्थांमुळे पोटात गडबड होऊ शकतो. तसंच कधीकधी आपण घाईघाईने जेवतो, अनेकदा यामुळेही पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवते. यावर गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. ब्लोटिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी या टिप्सची मदत होऊ शकते.
advertisement
गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सेठी यांच्या मते, पुदिन्याच्या चहामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. पोटातील सूज कमी करायची असेल तर पुदिन्याचा चहा हा चांगला पर्याय आहे. पुदिन्यात मेन्थॉल नावाचा घटक असतो. यामुळे आपल्या पचनसंस्थेतील स्नायूंना आराम मिळू शकतो.
स्वयंपाकघरातील एक मुख्य पदार्थ, बडीशेप ही चव आणि आरोग्याचा खजिना आहे. डॉक्टर सेठी जेवणानंतर बडीशेप चघळण्याची शिफारस करतात, यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. बडीशेपेमुळे पोटातील अतिरिक्त वायू बाहेर काढण्यास मदत होते. पोटफुगीवर मात करण्यासाठी, हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
अनेकदा, आपल्याला पोटफुगीचं खरं कारण कळत नाही. डॉक्टरांच्या मते, अनेकांना लॅक्टोजचा त्रास होतो. याचा अर्थ त्यांचं शरीर दूध किंवा चीज, दही आणि मिठाई यांसारखे दुग्धजन्य पदार्थ योग्यरित्या पचवू शकत नाही. दूध प्यायल्यानंतर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर तीस मिनिटांपासून दोन तासांच्या आत पोटफुगी जाणवत असेल, तर दूध हे मूळ कारण असू शकतं. यामुळे तुम्ही काही दिवस दूध टाळू शकता.
अनेकजण, उन्हाळ्यात, कोल्ड्रिंक्स किंवा सोडा पितात. या कार्बोनेटेड पेयांमधे कार्बन डायऑक्साइड वायू असतो. ही पेय पिता तेव्हा थेट पोटात गॅसचे बुडबुडे पाठवत असता. हे बुडबुडे तुमच्या पोटात आणि आतड्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे ढेकर येणं, पोट फुगणं आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात. पोट हलकं ठेवायचं असेल तर कार्बोनेटेड पेय मर्यादित प्रमाणात प्या.
जास्त फायबर खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर हे टाळा. कारण डॉक्टरांच्या मते, फायबर शरीरासाठी चांगलं आहे, पण ते हळूहळू वाढवावं. अचानक जास्त फायबर खायला सुरुवात केली तर तुमच्या आतड्यांतील बॅक्टेरियांना ते पचवण्यास त्रास होईल. यामुळे पोटात पेटके, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.
