युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने गडचिरोलीतील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनींना मासिक पाळीविषयी जनजागृती करणारे वर्ग आयोजित केले जात आहेत. या वर्गात मासिक पाळीत सॅनिटरी पॅड कसे वापरावेत, त्या काळात आहार कसा ठेवावा?, स्वच्छता कशी ठेवावी, याविषयी इयत्ता पहिली ते दहावीतील मुलींना मार्गदर्शन केले जात आहे.
मासिक पाळीविषयी समाजात अजूनही अनेक गैरसमज पसरलेले आढळून येतात. अनेक मुलींना वयानुसार आपल्या शरीरात होणाऱ्या या बदलांविषयी माहिती नसते. यासाठी युवा परिवर्तन संस्थेतर्फे गडचिरोलीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पाळीविषयी जगजागृती करणारे वर्ग घेतले जात आहेत. आतापर्यंत 82 शाळांमध्ये हे वर्ग घेतलेले आहेत.
advertisement
यावेळीस विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या वेळेस शरीरात होणारे बदल, सॅनिटरी पॅड कसा लावायचा, त्याची विल्हेवाट कशी लावायची याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. त्याचबरोबर मासिक पाळीच्या दिवसात आहार कसा असायला पाहिजे, व्यायाम काय करायला पहिजे याबद्दलही सांगितले जाते.
मासिक पाळीविषयी शाळांमध्ये मुलींना केलं जातंय मार्गदर्शन
2000 सॅनिटरी पॅड्सचे वाटप -
संस्थेच्या कर्मचारी सायली कडस्कर याविषयी बोलताना म्हणाल्या की, गडचिरोलींमधील अनेक शाळांमध्ये मासिक पाळींविषयी मुलींना माहिती नाही आणि शाळांमध्ये वर्ग घेताना मुलींच्या अनेक प्रश्नांचे आम्ही निरसन केले. तसेच मुलींसोबत आम्ही काही शाळांमध्ये मुलांनाही मासिक पाळीविषयी माहिती देत आहोत. 82 शाळांमध्ये आम्ही आतापर्यंत आम्ही 2000 सॅनिटरी पॅड्सचे वाटप केले आहे, अशी माहितीही संस्थेच्या कर्मचारी सायली कडस्कर यांनी सांगितले. तर जिल्हा परिषद शाळा धानोरा, मोहाली, तसेच स्व. रामचंद्रजी ढाकणे शाळा मुरुडगाव, महेश सावरकर पोरेतीवार हायस्कूल येथील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
