कोल्हापूर : नवीन वर्ष सुरु झाले की प्रत्येक जण काही ना काही संकल्प नक्कीच करत असतो. कोणी आपल्या खाण्या पिण्याच्या गोष्टींबाबत, कोणी वाईट सवयी सोडण्याबाबत संकल्प करत असतो. तर बऱ्याच जणांचा व्यायाम वेगैरे करून आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा संकल्प असतो. व्यायाम करण्यासाठी चांगली जिम देखील लावली जाते. मात्र जिमला जाण्याची नियमतता हळूहळू कमी होऊन जिमला जाणेच बंद होऊन जाते. मग पुन्हा प्रश्न पडतो की तब्येतीचे काय? त्यामुळे घरच्या घरी आपण काही सोपी योगासने करून स्वतःला फिट ठेवू शकतो. अशाच काही योगासनांबाबत कोल्हापूरच्या योग प्रशिक्षक हर्षदा काबडे यांनी सांगितले आहे.
advertisement
घरच्या घरी किंवा बागेत, टेरेस वर असे कुठेही आपण ही योगासने करू शकतो. सहज सोप्या पद्धतीने करता येणारी असली तरी नियमित ही योगासने केल्यास आपल्यास अनेक फायदे होऊ शकतात, असेही हर्षदा यांनी सांगितले आहे.
PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळेल आराम, हा रामबाण उपाय नक्की करून पाहा, Video
1) ताडासन :
ताडासन हे आसन उभे राहून करायचे आसन आहे. ताडासनासाठी सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये एका फुटाचे अंतर घेऊन उभे राहावे. दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये फसवून ती डोक्याच्या वरच्या बाजूला न्यावेत. दोन्ही टाचा वर उचलून फक्त पायाच्या चवड्यावर उभे राहून हे आसन करावे. दृष्टी समोर ठेवून हात वरच्या बाजूला जितके ताणता येतील, तितके ताणावेत. 1 ते 2 मिनिट या स्थितीत थांबून शेवटी हळूहळू हात खाली घ्यावेत.
फायदे :-
ताडासन नियमित केल्यामुळे लहान मुलांची उंची वाढण्यासाठी मदत होते. या आसनामुळे पायातील अशुद्ध रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुरळीत होतो. या आसनामुळे टाचदुखी किंवा पायासंबंधित कोणत्याही समस्या कमी होण्यास मदत होते.
2) वृक्षासन :
वृक्षासनाला ट्री पोज म्हणून देखील ओळखले जाते. यासाठी आपला एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या बाजूला ठेवून सर्व शरीर फक्त एका पायावर स्थिर करावे. आपल्या हात हळूहळू डोक्यावर घेऊन नमस्कार स्थितीत वर उचलावेत. समोर एखाद्या भिंतीवर दृष्टी केंद्रित करून आपल्या हात वरच्या दिशेने ताणावेत. अशाच पद्धतीने दुसऱ्या पायावर देखील उभे राहून आसन करावे.
फायदा :-
या आसनामुळे शरीराचे संपूर्ण वजन एका पायावर स्थिर केले जाते. त्यामुळे पायातील मांसपेशी ताकदवान बनतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, सहनशक्ती, एकाग्रता वाढण्यास या आसनामुळे मदत होते. तसेच या आसनामुळे मन शांत राहून हायपर टेन्शन कमी होण्यास मदत होते.
Makar Sankranti Bornhan: मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का करतात? काय आहे परंपरा? Video
3) वृश्चिकासन किंवा वृश्चिक भुजंगासन :
वृश्चिकासन करताना सुरुवातीला पोटावर झोपावे. आपले तळहात कोपऱ्यापर्यंत जमिनीला टेकवावेत आणि छातीपासून डोक्यापर्यंतचा आपला भाग वरच्या दिशेने उचलावा. तर आपले पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावेत. मानेला थोडा ताण पडेल अशा स्थितीत आपली नजर ठेवायची आहे.
फायदा :-
या आसनामुळे थायरॉईड ग्रंथी सक्षम बनतात. तसेच हॅप्पी हार्मोन्स सक्रिय होतात. स्त्रियांनी हे आसन केल्यास मासिक पाळी वेळी होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. खांदे मजबूत बनतात, पोटाचा मसाज होतो. त्याचबरोबर हार्मोनल असंतुलन या आसनामुळे दूर केला जातो.
4) संपूर्ण भुजंगासन :
शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकरच्या समस्या कमी करण्यासाठी भुजंगासन हे रामबाण आसन आहे. त्यामुळे भुजंगासनला सर्व आसनांचा राजा मानले जाते. हे आसन करताना पोटावर झोपून दोन्ही हात छातीजवळ घ्यावेत. तळहातावर आपल्या शरीराचे वजन पेलत कमरेपासून वरचा शरीराचा भाग वर उचलावा. मागे पायाला ताण देत मानेला वरच्या बाजूला ताण द्यायचा आहे. आसन सोडताना पुन्हा पूर्वस्थितीत हळूहळू यावे.
फायदा :-
या आसनामुळे शरीराच्या समोरच्या आणि मागील बाजूला ताण जाणवतो. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत बनतो. पोटाच्या स्नायूंवर ताण येऊन पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.
कोल्हापूरचा विषयच वेगळा, रंकाळ्यावर कुत्री आणि प्रेमीयुगुलांना नवा नियम, अजिबात ही चूक करू नका!
5) वज्रासन योग मुद्रा :
वज्रासन योगमुद्रा करण्यासाठी सुरुवातीला गुडघे जमिनीला टेकवून पायावर बसावे. दोन्ही हात पाठीमागे लॉक करावेत. श्वास घेऊन पाठीचा कणा ताठ ठेवत हळूहळू श्वास सोडत आपले कपाळ जमिनीकडे झुकवावे. हे करताना नितंब वर उचलू नये. 30 ते 40 सेकंद याच स्थितीत थांबून पुन्हा वर उठावे.
फायदे :-
हे आसन करताना आसन आणि योगमुद्रेचा फायदा आपल्याला मिळतो. वज्रासन नियमित केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यास मदत होते.
6) दंडासन :
दंडासन करताना जमिनीवर पाय एकमेकांना चिकटवून लांब सोडून बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवत मांडीवर किंवा जमिनीवर ठेवावेत. या स्थितीत 30 ते 40 सेकंद थांबावे.
फायदे :-
दंडासणाच्या नियमित सरावामुळे पाठ आणि कंबर एका रेषेत राहण्यास मदत होते. पाठीचा झुकावदारपणा कमी येऊन आपले व्यक्तिमत्व उठावदार दिसते.
7) मार्जारासन :
मांजराच्या प्रमाणे आपल्या शरीराची स्थिती करणे म्हणजेच मार्जारासन होय. हे आसन करताना कमरेच्या सरळ रेषेत पाय ठेवून आपल्या तळहात खांद्याच्या रेषेत जमिनीला टेकवावेत. श्वास घेत घेत पाठ आणि पोट वरच्या दिशेने उचलावे. यावेळी आपली हनुवटी मानेला चिकटून ठेवावी आणि श्वास सोडावा. त्यानंतर श्वास घेत पाठ आणि पोट खालच्या दिशेने झुकून मानेला वरच्या दिशेने ताण द्यावा. हे आसन करताना नितंबावर ताण जाणवू द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने 7 ते 8 आवर्तने करावीत.
फायदे :-
मार्जारासन करताना पोट, पाठ, कंबर आणि खांदे या सर्वांचा व्यायाम होतो. या आसनामुळे या सर्व अवयवांच्या समस्या त्याचबरोबर स्पॉन्डिलायटिसची समस्या देखील कमी होण्यास मदत होते. मार्जारासन नियमित केल्यामुळे थायरॉईड ग्रंथीची कार्यक्षमता वाढते.
दरम्यान, सोपी अशी योगासने योग्य प्रकारे रोज केल्यास आपल्या शरीरासह मनाला देखील शांती लाभण्यासाठी मदत होईल. त्यामुळे घरच्या घरी या योगासनांद्वारे आपले मन आणि शरीर फिट नक्कीच ठेवता येईल.