Makar Sankranti Bornhan: मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का करतात? काय आहे परंपरा? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
Makar Sankranti 2024 मकर संक्रांतीला बोरन्हाण करण्यामागे वातावरणातील बदल हेही एक कारण आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. तिळगूळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकूचा कार्यक्रम, त्यासाठी वाण देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरन्हाण. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. पण यामागे कारण काय असते? हे काही जणांना माहिती नसते. बोरन्हाण का केले जाते? आणि ते कसे करावे? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक राजेश जोशी यांनी सांगितले आहे.
advertisement
बोरन्हाण का केले जाते?
बोरन्हाण का करायचे या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडतात. ते टाळण्यासाठी सर्वात आधी श्रीकृष्णाचे बोरन्हाण केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली. तेव्हापासून लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
वातावरणातील बदल
मकर संक्रांतीला बोरन्हाण करण्यामागे वातावरणातील बदल हेही एक कारण आहे. या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. लहान मुलं इतरवेळी ती फळं दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते, असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते.
advertisement
बोरन्हाण कसे करावे?
1 ते 5 वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. एकप्रकारे बाळाला या पदार्थांनी आंघोळ घातली जाते. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरन्हाणसाठी वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत. म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो.
advertisement
संक्रांतीनंतर 15 दिवस करतात बोरन्हाण
याला काही भागात बोरलुट असेही म्हणतात. यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत. हे बोरन्हान संक्रांती नंतर देखील 15 दिवस केल जात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 13, 2024 1:56 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti Bornhan: मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का करतात? काय आहे परंपरा? Video