अमावस्येला मराठवाड्यात गावं ओस का पडतात? काय आहे नेमकं कारण? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाड्यात येळवस हा सण साजरा करण्याची अनोखी परंपरा असून या काळात गाव ओस पडतं.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये वेळा अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. आज 11 जानेवारी रोजी वेळ अमावस्या असल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्येच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. तसेच एकही व्यक्ती गावात दिसत नाही. ग्रामीण भाषेत या सणाला यळवस असही म्हणतात. शेतात सहकुटुंब जाऊन घरून बनवून आणलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो. तसेच, पूजा करून निसर्गाच्या सानिध्यात सह कुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला जातो. याबाबतच स्थानिकांकडून माहिती घेऊयात.
advertisement
धरती मातेची पूजा
वेळ अमावस्ये दिवशी समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी भूदेवीकडे करत असतात. सर्वदात्या धरती माय-माऊलीचे आपण काहीतरी देणं लागतो. या पवित्र भावनेने कर्नाटक आणि लगतच्या भागात म्हणजे मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद आणि इतर काही भागात शेतकरी बांधव येळवस मोठ्या आनंदाने साजरी करतात. या भागात ही जुनी प्रथा आहे. वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची खोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांची देखील पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच दगडांना चुण्याने रंगवून पांडवाची पूजा केली जाते, असं स्थानिक संजय नलवाड यांनी सांगितले.
advertisement
अयोध्येला जाण्याआधीच महाराष्ट्रात या ठिकाणी उभं राहतंय खास राम मंदिर, इतक्या कोटींचा केला खर्च Video
पाण्याचेही होते पूजन
भारतात सिंधूकालिन संस्कृतीपासून नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हापासून जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सात नद्या (सप्त सिंधू) भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त होते. त्याच सप्तसिंधू नद्यांना आराध्य म्हणून पुजण्याची परंपरा सुरू झाली. लोक नदीच्या पाण्याचे पुजन करु लागले. पण कालांतराने बारामहिने वाहणाऱ्या नद्या आटल्या. शेतकऱ्यांनी शेतात वावरातील पिक भिजवण्यासाठी, पिण्याच्या पाण्याकरता विहिरी खोदल्या. आता त्यातले पाणी हे या सप्त सिंधूचे प्रतिक म्हणून पुजले जाते. शेतात असलेल्या विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगडांना रंगवून त्याला पुजनाची परंपरा सुरु झाली आणि त्यांना आसरा म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
आसरा म्हणजे काय?
आसरा म्हणजे राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी देवता. याच आसराची पूजा येळवसच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्यांची खोप करुन केली जाते. शेतकरी बांधव संध्याकाळी ज्वारीच्या पेंढीचा टेंभा करुन शेतातल्या गहू, हरभरा या पिकांवरून तो ओवाळतात, जेणेकरून रब्बी हंगामातल्या या पिकांना कुणाची नजर लागू नये. त्यानंतर शेतकरी मंडळी घराकडे परततात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
January 11, 2024 6:21 PM IST