कोडरमा : उन्हाळ्यात भरपूर घाम येतो, त्यामुळे खूप तहान लागते. हिवाळ्यात मात्र थंड वातावरणात शरीराला पाण्याची गरज आहे हेच जाणवत नाही. तहान कमी लागल्यानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्यातून विविध त्रास उद्भवतात. मूतखडेही त्यातूनच निर्माण होतात.
पुरेसं पाणी न मिळाल्यानं शरीर व्यवस्थित स्वच्छ होत नाही. लघवीवाटे सोडियम, युरिया, टाकाऊ पदार्थ बाहेर पडत नाहीत. ते खड्यांच्या स्वरूपात जमा होऊ लागतात आणि मूतखड्यांचं रूप घेतात.
advertisement
डॉ. रंजीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात शरीरात 4-5 लिटर पाणी जायलाच हवं. कमी पाणी प्यायल्यास लघवीत मिनरल आणि सॉल्ट वाढतं. त्यांचं रुपांतर खड्यांमध्ये होऊ लागतं. मग ते एकाच ठिकाणी जमा झाल्यास त्यांना 'मूतखडे' म्हणतात. या त्रासात पाठीच्या खाली दोन्ही बाजूला वेदना होतात, लघवीच्या जागी जळजळ होते, कधीकधी लघवीवाटे रक्तही येऊ शकतं. यापैकी कोणताही त्रास झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं आणि त्यांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावे.
पालक भाजी, टोमॅटो, इत्यादी जास्त प्रमाणात खाल्ल्यानंही किडनीत खडे होऊ शकतात, लघवी नलिकेत खडे जमा होऊ शकतात. कॅल्शियमची औषधं अधिक प्रमाणात खाल्ल्यास युरिक ॲसिड वाढण्याचा धोका असतो. खरंतर हे मूतखडे होण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. खूप वेळ लघवी न केल्यानं, लघवी रोखून ठेवल्यानंही मूतखडे होऊ शकतात.
डॉक्टर सांगतात की, मूतखड्यांचा त्रास होऊ नये यासाठी शरीरात पुरेसं पाणी जाणं आवश्यक असतं. दिवसभरात भरपूर पाणी प्यावं. नियमितपणे व्यायाम करावा. जंक फूड खाऊ नये. जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये. डबाबंद अन्न खाणंही टाळावं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
