वरूड (बु.) येथील सात वर्षांची देवांशी गावंडे अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. सतत ताप, पोटदुखी आणि मळमळ यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. नागपूर येथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी देवांशीचे यकृत अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे निदान केले. तिचा जीव वाचविण्यासाठी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले. मात्र या उपचारासाठी तब्बल 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला होता जो भाजीविक्रेती असलेल्या कुटुंबासाठी प्रचंड मोठा होता.
advertisement
या संकटाच्या काळात देवांशीच्या वडिलांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ बाबत माहिती मिळाली. त्यांनी त्वरित कक्षाशी संपर्क साधला. कक्षप्रमुख रामेश्वर नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. टाटा ट्रस्ट आणि इतर सामाजिक संस्थांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. गावातील नागरिकांनीही वर्गणी उभारून कुटुंबाला मदतीचा हात दिला.
दरम्यान देवांशीच्या आईने आपल्या लेकीसाठी स्वतःचे यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या मातृत्वपूर्ण निर्णयामुळे देवांशीच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले. मुंबईतील वाडिया रुग्णालयात झालेली ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर देवांशीची प्रकृती सुधारू लागली आणि अखेर ती पूर्णपणे बरी झाली.
सध्या देवांशीची तब्येत स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा मोलाचा वाटा असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
आईच्या त्यागामुळे आणि शासनाच्या मदतीमुळे एका निरागस जीवाला नवजीवन मिळाले आहे. देवांशीच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सहायता निधी, वैद्यकीय मदत कक्ष तसेच सर्व मदतीचा हात देणाऱ्या संस्था व दानशूर नागरिकांचे आभार मानले आहेत.