मोहरीचं तेल :
कोणत्याही वेदनेवर मोहरीचं तेल उपयुक्त असतं. मोहरीच्या तेलात लसणीच्या पाकळ्या घालून ते तेल चांगलं गरम करून घ्या. तेल कोमट झालं, की पायांच्या स्नायूंवर तेलानं मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं. तसंच आखडलेले स्नायू मोकळे होतात.
लसणीचं तेल :
मोहरीच्या तेलात लसणीच्या 10 पाकळ्या, 25 ग्रॅम ओवा आणि 10 ग्रॅम लवंगा घालून ते उकळून घ्या. तेलातून धूर येऊ लागल्यावर गॅस बंद करा व थंड करून बाटलीत भरून ठेवा. या तेलानं थंडीत मालिश केल्याने गुडघेदुखी कमी होते.
advertisement
गरम पाणी व मीठ :
रोज रात्री थोड्या गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्यात सुती कपडा बुडवून त्या कपड्यानं स्नायूंना शेक द्या. यामुळेही वेदनेवर आराम पडू शकतो.
आलं :
आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सूज, वेदना, तसंच स्नायू आखडले असतील, तर ते गुणकारी ठरतं. आलं नियमित खा. दुखणं जास्त असेल, तर मोहरीच्या तेलात आल्याचा रस घालून त्यानं मालिश करा.
थंडीत स्नायूदुखी कमी करण्यासाठी मालिश, शेक या गोष्टी तर उपयोगी पडतातच; पण त्याशिवाय आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करणं, व्यायाम करणंही उपयोगी ठरतं. त्यासाठी थंडीत फिटनेस जपा. नियमित व्यायाम केल्यानं वात येणं, स्नायूदुखी अशा तक्रारी जाणवत नाहीत. शरीराला सतत ताण देत राहिल्यानं दुखणं दूर राहील. तसंच थंडीच्या काळात तेलकट पदार्थ खाणं टाळा. शक्यतो आरोग्यदायी जेवण घ्या. हिरव्या पालेभाज्यांना आहारात स्थान द्या. थंडीमध्ये पाणी कमी प्यायलं जातं; पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायलाच हवं.
योग्य आहार-विहार व त्यासोबत मोहरीचं तेलाचं मालिश, आल्याचा आहारात समावेश अशा छोट्या छोट्या गोष्टींनी थंडीत स्नायूंचं दुखणं दूर करता येऊ शकतं.