मखाने नियमित खाल्ल्यास शरीराला प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हे हृदयासाठी चांगले असून पचन सुधारण्यास मदत करतात. मात्र कमी दर्जाचे किंवा जुने मखाने खाल्ल्यास चव बिघडतेच, शिवाय आरोग्यालाही फारसा फायदा होत नाही. त्यामुळे मखाने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
या टिप्सने ओळखा उत्तम दर्जाचे मखाने..
advertisement
माखान्यांचा आकार पाहा : सर्वप्रथम मखान्यांच्या आकाराकडे लक्ष द्या. चांगल्या प्रतीचे मखाने साधारणपणे मोठ्या आकाराचे, गोलसर आणि भरदार दिसतात. खूप छोटे, तुटलेले किंवा आकुंचन पावलेले मखाने कमी दर्जाचे असू शकतात. मोठ्या आकाराचे मखाने भाजल्यावर अधिक कुरकुरीत होतात आणि चवही चांगली लागते.
माखान्यांचा रंग : दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मखान्यांचा रंग आणि रूप. उत्तम दर्जाचे मखाने स्वच्छ पांढऱ्या किंवा किंचित क्रीम रंगाचे असतात. त्यावर काळे डाग, पिवळसरपणा किंवा जास्त भेगा नसाव्यात. जर मखाने खूप मळकट किंवा रंग बदललेले दिसत असतील, तर ते जुने किंवा खराब साठवणीत ठेवलेले असू शकतात.
मखान्यांचा ग्रेड : हा देखील गुणवत्तेचा महत्त्वाचा निकष मानला जातो. बाजारात 4, 5, 6 किंवा 6.5 ग्रेडचे मखाने मिळतात. यामध्ये 6 किंवा 6.5 ग्रेडचे मखाने सर्वात चांगल्या प्रतीचे मानले जातात. हे मखाने आकाराने मोठे, वजनदार आणि आतून पोकळ नसतात. त्यामुळे भाजताना ते चांगले फुलतात आणि खायला अधिक चविष्ट लागतात.
मखाने हातात घेऊन पाहा : यामुळे मखान्याची घनता आणि मजबुती कळते. चांगले मखाने हातात घेतल्यावर हलके वाटतात पण तुटत नाहीत. खूप नाजूक किंवा सहज तुटणारे मखाने जुने असण्याची शक्यता असते. तसेच एक मखाना तोडून पाहिल्यास आतून तो पांढरा आणि कोरडा असावा, ओलसर किंवा पिवळसर नसावा.
शेवटी, मखाने खरेदी करताना शक्यतो हवाबंद पॅकिंग असलेले किंवा विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच घ्यावेत. उघड्यावर ठेवलेले मखाने ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते. योग्य दर्जाचे मखाने निवडल्यास त्यांची चव तर छान लागतेच, पण आरोग्यासाठीही ते अधिक फायदेशीर ठरतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
