किडनी निकामी होण्यामागे मुख्यत्वे दीर्घकाळ अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही कारणे असतात. याव्यतिरिक्त, किडनीला होणारे संसर्ग, औषधांचे दुष्परिणाम किंवा अनुवांशिक कारणे देखील कारणीभूत ठरू शकतात. किडनी निकामी होत असताना काही लक्षण दिसतात. ती वेळीच ओळखता आली तर आपण त्यावर योग्य उपचार घेऊ शकतो. चला पाहूया ती लक्षणे कोणती आहेत.
advertisement
किडनी डॅमेज झाल्यास दिसतात ही लक्षणं..
वारंवार मूत्रविसर्जन : मूत्रपिंड खराब होण्याचे हे एक महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षण आहे. जर तुम्हाला वारंवार मूत्रविसर्जन करावे लागत असेल किंवा याच्या अगदी उलट, मूत्र विसर्जन खूप कमी होत असेल, तर सावधगिरी बाळगावी. मूत्राचा रंग खूप गडद होणे किंवा त्यात जास्त फेस दिसणे हे देखील किडनीच्या समस्येचे संकेत असू शकतात.
शरीरात सूज येणे : शरीरात वारंवार सूज येणे हे किडनी खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे. किडनी शरीरातील जास्तीचे पाणी आणि सोडियम बाहेर काढू शकत नसल्यामुळे ही सूज येते. विशेषत: सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली, पायांवर किंवा घोट्याला सूज दिसणे किडनीच्या बिघाडाकडे लक्ष वेधते.
अचानक वजन कमी होणे : अचानक वजन कमी होणे किंवा शरीर खूप अशक्त वाटणे हे देखील किडनीच्या समस्यांचे लक्षण आहे. किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नसल्यामुळे, शरीराची एकूण आरोग्यस्थिती वेगाने बिघडते.
पोटाचे त्रास : भूख कमी लागणे, वारंवार मळमळ होणे किंवा उलट्या होणे हे देखील किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. शरीरात टाकाऊ पदार्थ जमा झाल्यामुळे पोटासंबंधीच्या या तक्रारी वाढू शकतात.
श्वास घेण्यास त्रास होणे : श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जिना चढताना धाप लागणे हे देखील किडनी खराब होण्याचे संकेत देतात. शरीरात पाणी जमा झाल्यामुळे फुफ्फुसांवर दबाव येतो आणि रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हा त्रास होतो.
झोपेची कमतरता : रात्री व्यवस्थित झोप न लागणे किंवा बेचैनी जाणवणे हे देखील किडनी खराब होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. रक्त नीट शुद्ध न झाल्यामुळे, ही घाण मेंदू आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करते.
थकवा, अशक्तपणा आणि ॲनिमिया : लवकर थकवा जाणवणे आणि सतत अशक्तपणा येणे हे किडनीच्या बिघाडाचे लक्षण असू शकते. जेव्हा किडनी रक्त व्यवस्थित स्वच्छ करत नाही, तेव्हा शरीरातील टाकाऊ पदार्थ वाढतात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. किडनी एक हार्मोन तयार करते, जे लाल रक्तपेशी बनविण्यात मदत करते. किडनी निकामी झाल्यास या हार्मोनची निर्मिती कमी होते, ज्यामुळे ॲनिमिया होतो. ॲनिमियामुळे अधिक थकवा आणि कमजोरी येते.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास आणि योग्य उपचार सुरू केल्यास किडनीला होणारे पुढील नुकसान टाळता येऊ शकते आणि जीवनशैलीत सुधारणा करता येते. नियमित तपासण्या आणि संतुलित आहार किडनीचे आरोग्य जपण्यास मदत करतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
