किडनी स्टोन म्हणजे काय ?
रक्त शुद्ध करून मूत्राद्वारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणं हे किडनीचं एक महत्त्वाचं कार्य. मात्र खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जेव्हा खनिजं आणि इतर टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडात जमा होऊन त्यांच रूपांतर दगडात होतं. यालाच किडनी स्टोन असं म्हणतात. किडनी स्टोनमुळे तीव्र स्वरूपाच्या पोटदुखीला सामोरं जावं लागतं. अनेकदा लघवी करताना जळजळ होणं किंवा लघवीतून रक्तही पडू लागतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
advertisement
टाळा ‘हे’ पदार्थ
किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही ही समस्या दूर केली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनी किडनी स्टोनचा नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. अनेक पदार्थांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ऑक्सलेटयुक्त पदार्थांचं सेवन टाळलं तर किडनी स्टोनचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. किडनी स्टोन टाळण्यासाठी जास्त प्रमाणात मीठ आणि साखर न खाणं, भरपूर पाणी पिणं आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. सोनिया रावत देतात.
जाणून घेऊयात किडनीस्टोनचा त्रास असणाऱ्यांनी कोणते पदार्थ खाणं टाळावं ते
पालक : पालक भाजीत ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असतं. जे किडनी स्टोन तयार होण्याचं एक प्रमुख कारण ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनच्या त्रासाला दूर ठेवायचं असेल तर पालक खाणं टाळणं हे फायद्याचं ठरतं.
चॉकलेट : चॉकलेटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असतं. जे किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. अतिप्रमाणात चॉकलेटचं जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका आणि स्टोनचा आकार वाढू शकतो. याशिवाय अतिप्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने डायबिटीसचा धोकाही उद्भवतो.
टोमॅटो : टोमॅटोमध्ये ऑक्सलेट चांगल्या प्रमाणात असतात आणि ते किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात टोमॅटो खाणं हे धोक्याचं ठरू शकतं. याशिवाय टोमॅटोच्या बियांसुद्धा पोटदुखीचं कारण ठरू शकतात. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशांनी तर टोमॅटोचं सेवन टाळावंच.
दुग्धजन्य पदार्थ : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळून येतं. हे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याचं जरी असलं तरीही ते किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांसाठी ते डोकेदुखीचं कारण ठरू शकतं.
फळांचा रस : फळांचा रस हा आरोग्यासाठी पौष्टिक जरी असला तरीही किडनीसाठी तो धोक्याचा ठरू शकतो. विशेषतः द्राक्षाचा रस किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो.
हे सुद्धा वाचा : 'ही' हिरवीगार भाजी हार्टसाठी रामबाण! जास्त खाल्ली तर होतो किडनी स्टोन
मटन / लाल मांस : मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी लाल मांस अधिक हानिकारक ठरू शकतं. त्यात प्युरिनचं प्रमाण हे जास्त असतं, ज्यामुळे युरिक ॲसिडचाही त्रास वाढू शकतो.