पुणे: नवीन वर्ष सुरु झालं की पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा येतो. तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण गोड करत असतो. तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे ‘हलव्याचे दागिने’. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. दागिने घालण्याची ही पद्धत पारंपरिक आहे. पुण्यातील बाजारपेठेत या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटी दिसत आहेत.
advertisement
Makar Sankrant 2024 : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? पाहा वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं
70 रुपयांपासून दागिने
पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी हलव्याचे दागिने अगदी 70 रुपयांपासून पुढील किमतीस मिळत आहेत. हे दागिने आता ट्रेंडी झाले आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या दागिन्यांमध्ये अधिक कला-कुसर पाहायला मिळत आहे. खरंतरं लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला जोडप्याला हलव्याचे दागिने घातले जातात. काळ्या कपड्यांवर हलव्याचे हे सुंदर दागिने अधिक खुलून दिसतात.
हलव्याच्या दागिन्यांत मिळतायेत हे प्रकार
या हलव्याच्या दागिन्यामध्ये तुम्हाला पारंपरिक दागिने जास्त पाहायला मिळतील. यात ठुशी, शाही हार, मोहन माळ, बोर हार, चिंचपेटी गळ्यातला हार, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, बिंदी, कंबरपट्टा, मुकूट, वाकी, नथ असे एकाहून एक दागिने सध्या बाजारात उपलब्ध आहे. पुरुषांसाठीही मोठा हार, मुकूट, हातातले, फुलांचा गुच्छ असे दागिने मिळतात. यामध्ये कागदी किंवा खऱ्या फुलांसोबत केलेली डिझाइन, सोनेरी बेस असलेली डिझाइन, खोट्या फुलांचा वापर करुन केलेले कॉम्बिनेशन असे एकाहून एक प्रकार पाहायला मिळतात. हे दागिने तुम्हाला 70 रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंतच्या किमतीस मिळतील, अशी माहिती विक्रेत्या स्वप्ना ठाकूर यांनी दिली.