राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी राजगिऱ्याचे पीठ, पाऊण वाटी साखर, एक वाटी गरम दूध, दीड वाटी गरम पाणी, चार चमचे तूप, आवडीनुसार काजू, बदामाचे काप हे साहित्य लागेल.
राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी कृती
शिरा बनवण्यासाठी राजगिरे स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यातून रवाळ असे पीठ करून घ्या. कढईमध्ये चार चमचे तूप घालून मंद आचेवर गरम करून घ्या. तापलेल्या तुपामध्ये काजू-बदामाचे काप भाजून बाजूला काढा. तुपाच्या कढईमध्येच राजगिऱ्याचे पीठ घालून 2 मिनिटे एकसारखे भाजून घ्या. भाजलेल्या पिठामध्ये एक वाटी गरम दूध घाला. मिश्रण एकसारखे करत दुधामध्ये राजगिरा 2-3 मिनिटे शिजू द्यावा. त्यानंतर पाऊण वाटी साखर घाला. मिश्रण एकसारखे करत त्यामध्ये दीड वाटी गरम पाणी घालावे. त्यामध्ये बारीक चिरलेले काजू-बदामाचे काप आवडीनुसार वेलची पूड टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
advertisement
दोन-तीन मिनिटांसाठी मंद आचेवर राजगिरा शिजू द्यावा. तयार होईल मऊ लुसलुशीत असा पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा. चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि पचायला अगदी हलका असा राजगिऱ्याचा शिरा अनेक प्रथिनांचा खजिना आहे. नऊ महिन्यांच्या बाळापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच सहज खाता येणारा आणि पचवता येणारा पौष्टिक असा राजगिऱ्याचा शिरा केवळ उपवासालाच नव्हे तर वरचेवर आहारात घेणे गरजेचे ठरेल.