विकास करवंदे यांनी वयाच्या 55 व्या वर्षी सिंहगड चढायला सुरुवात केली. पहिल्यांदा फक्त चढाई करण्याची उत्सुकता होती. शंभर वेळा झाल्यावर आत्मविश्वास वाढला, 500 आणि नंतर 1000 वेळा झाल्यावर हे एक ध्येय बनलं, असं करवंदे सांगतात. आज त्यांच्या या प्रवासाला तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
advertisement
आठवड्यातून दोन वेळा गुरुवारी आणि रविवारी करवंदे काका नियमितपणे गड सर करतात. जरी आता वयाच्या ओघात ते पूर्ण किल्ला चढत नसले, तरी पहिल्या पायरीपर्यंत चढाई करण्याची सवय त्यांनी कायम ठेवली आहे. आता पूर्ण गड चढत नाही, पण पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर मनाला एक समाधान मिळतं ते हसत सांगतात.
करवंदे यांच्या या प्रवासात अनेक अडथळेही आले. परंतु न हारता नियमित व्यायाम आणि मनोबलाच्या जोरावर त्यांनी पुन्हा सिंहगडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जीवनात कधीच हार मानू नये. शरीर साथ देत असेल, तर मनही त्याला प्रेरणा देतं, असं ते म्हणतात. सिंहगड चढाई त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यांच्यासोबत एक ग्रुपही असतो, जो दर आठवड्याला चढाई करतो. ग्रुपसोबत चढताना आनंद दुप्पट होतो. आम्ही एकमेकांना प्रेरणा देतो.
करवंदे यांच्या या प्रवासातून तरुण पिढीने शिकण्यासारखे खूप काही आहे. आजच्या तंत्रज्ञानप्रधान जीवनात, व्यायाम आणि शारीरिक श्रम विसरून गेलेल्या समाजात करवंदे यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे. ते म्हणतात, तरुणांनी रोज पहाटे उठून व्यायाम केला पाहिजे. शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहते आणि मन मजबूत असेल तर कोणतीही उंची सर करता येते.
1995 साली सुरू झालेला हा प्रवास आज 1706 व्या पर्वापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक चढाईनंतर करवंदे यांना नव्या उर्जेची अनुभूती मिळते. सिंहगड म्हणजे माझ्यासाठी केवळ पर्वत नाही, तर जीवनशाळा आहे, असं ते सांगतात.





