यावर अनुभवी गिर्यारोहक दिवाकर साटम सांगतात की, ट्रेकिंगची सुरुवात ही सोप्या आणि कमी अवघड टप्प्यांपासून करावी. राजमाची, लोहगड, कर्नाळा, विसापूर यांसारखे ट्रेक नवशिक्यांसाठी योग्य ठरतात. या ट्रेक्समुळे शरीर आणि मनाची तयारी होते आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच सुरुवातीला ट्रेक करताना अनुभवी ट्रेकिंग ग्रुपसोबत जायचं ठरवल्यास ते अधिक सुरक्षित आणि मजेदार ठरतं. अशा ग्रुपमध्ये अनुभवी लोक असतात जे नवख्या ट्रेकर्सना योग्य मार्गदर्शन करतात. अनपेक्षित अडचणींमध्ये मदतीचा हात मिळतो आणि ट्रेकचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
advertisement
Indian Army: सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, दोन ठिकाणी रॅलीचे आयोजन
तसेच ट्रेकवर जाताना काही मूलभूत तयारी असणं आवश्यक आहे. योग्य ट्रेकिंग शूज, पुरेसं पाणी, हवामानानुसार कपडे आणि प्राथमिक औषधपेटी ही अत्यावश्यक बाबी आहेतच. त्याचबरोबर स्वतःचं ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे, कारण काही वेळा ओळख दर्शवणं गरजेचं ठरू शकतं. मोबाईल वापर करताना त्याची बॅटरी संपणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणूनच पॉवर बँक बरोबर ठेवावी, असं साटम आवर्जून सांगतात.
ट्रेकिंगच्या अनुभवावर बोलताना साटम सांगतात की, ट्रेक म्हणजे केवळ फोटो काढण्याची संधी नव्हे, तर तो निसर्गाशी जोडणारा एक गाढ अनुभव असतो. त्यामुळे ट्रेक करताना प्लास्टिक न टाकणं, पर्यावरणाची विशेष काळजी घेणं आणि स्थानिक लोकांशी सौजन्याने वागणं ही प्रत्येक ट्रेकरची जबाबदारी असते. सामान्य वाटणाऱ्या या गोष्टी लक्षात घेतल्या तर ट्रेकिंगची सुरुवात अधिक सोपी, सुरक्षित आणि संस्मरणीय होऊ शकते.