हवामानात अचानक बदल, बोटींची वाहतूक थांबवली
समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने शिडाच्या बोटी चालवणे अवघड झाले. पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून बंदर विभागाने बोटींची वाहतूक तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर किल्ल्याकडे जाणारी सर्व फेरी सेवा थांबवण्यात आली आणि पर्यटकांचा हिरमोड झाला.
Mumbai Water Metro : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता समुद्रातून धावणार मेट्रो?,नेमका प्लॅन काय?
advertisement
नऊ दिवसांनंतर किल्ल्याचे दरवाजे पुन्हा खुले
तब्बल नऊ दिवसांपासून बंद असलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला अखेर सोमवारी (दि. 3 नोव्हेंबर) पर्यटकांसाठी पुन्हा खुला झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच महाराष्ट्राबाहेरून आलेले पर्यटक किल्ला पाहू शकले नसल्याने निराश झाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याची मागणी केली होती.
हवामान अनुकूल, बोटी पुन्हा सुरू
हवामान स्थिर झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच बोटींची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले की, “हवामान अनुकूल झाल्याने बोटी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आता पर्यटक सुरक्षितपणे जंजिरा किल्ल्याची सफर करू शकतात.”
पर्यटन व्यवसायाला दिलासा
या नऊ दिवसांच्या बंदीमुळे मुरुड परिसरातील हॉटेल, होम-स्टे, फेरी सेवा, खाद्यपदार्थ विक्रेते आणि स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला होता. मात्र, किल्ला पुन्हा खुला झाल्याने पर्यटन क्षेत्राला दिलासा मिळाला आहे आणि व्यवसायात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या जेट्टीचे काम लवकर पूर्ण करून पर्यटकांसाठी खुली करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. जेट्टी सुरू झाल्यास किल्ल्यापर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






