मुंबई: मुंबईकरांसाठी आणि शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मलबार हिलमध्ये शहरातील पहिलाच उंचावरचा ‘एलिव्हेटेड नेचर ट्रेल’ आता सर्वांसाठी खुला झाला आहे. कमला नेहरू पार्क ते फिरोजशाह मेहता गार्डनदरम्यान 485 मीटर लांबीच्या लाकडी पदपथाने तयार करण्यात आलेल्या या ट्रेलचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत येथे भेट देऊ शकतात.
advertisement
बुकिंग आणि तिकिट दर
या ट्रेलसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. https://naturetrail.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘आता बुक करा’ या पर्यायावर क्लिक करून तिकीट बुक करता येते. भारतीय नागरिकांसाठी तिकीट दर 25 रुपये तर परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये इतका आहे. एकावेळी फक्त 200 पर्यटकांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे ऑनलाईन आगाऊ बुकिंगला अधिक प्राधान्य दिलं जात आहे.
प्रवेशाची प्रक्रिया
पर्यटकांनी पसंतीची तारीख व वेळ निवडून नोंदणी करावी लागते. त्यानंतर अभ्यागतांची संख्या आणि तपशील भरून ऑनलाइन पेमेंट करून तिकीट बुक करता येते. तसेच, ऑफलाइन तिकीट खरेदीचीही सुविधा आहे.
प्रमुख आकर्षणं
या एलिव्हेटेड ट्रेलमध्ये 100 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती, विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी यांची झलक पाहायला मिळते. याशिवाय, पक्षी निरीक्षणासाठी खास विभाग, काचेच्या तळाचा निरीक्षण डेक आणि समुद्राकडे पाहणारा व्ह्यू डेक हेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता भुयारी मेट्रोने सुस्साट प्रवास, लवकरच दुसरा टप्पा सेवेत
महत्त्वाच्या सूचना
ट्रेलमध्ये बाहेरचं अन्न नेण्यास परवानगी नाही, मात्र पाण्याच्या बाटल्या नेता येतात. सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी एकावेळी मर्यादित लोकांना प्रवेश दिला जातो.
सिंगापूरच्या लोकप्रिय ट्री टॉप वॉकच्या मॉडेलनुसार बनवलेला हा निसर्ग मार्ग जवळजवळ चार वर्षे लागला आणि आता तो शहरातील निसर्गप्रेमींचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
निसर्गाच्या कुशीत शांतता अनुभवण्यासाठी आणि शहराच्या गोंगाटातून काही वेळ दूर जाण्यासाठी मलबार हिलचा एलिव्हेटेड नेचर ट्रेल एक नवा, सुंदर पर्याय ठरतो आहे.