दरवर्षी सिंहगडावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. गेल्या दोन पावसाळ्यांत सलग दोन वर्षे अशी वेळ आली की, एका दिवसात तब्बल 12 ते 15 हजार पर्यटक गडावर पोहोचले. यामुळे सुरक्षेच्या समस्या वाढल्या. दोन वेळा दरड कोसळल्याने पर्यटक गडावर अडकले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीवर नियंत्रणासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
Ganeshotsav 2025: पुण्यातील इंद्रजीत यांची कमाल, AI च्या मदतीने साकारली गणपतीची 3D मूर्ती, Video
हे अॅप Google Play Store वर उपलब्ध असून, लवकरच आयफोन वापरणाऱ्यांसाठीही उपलब्ध होईल. एकदा दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेवा सुरू झाल्यानंतर सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य होईल.
अॅपमध्ये खालील सोयी देण्यात आल्या आहेत
सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाइन प्रवेश बुकिंग
सिंहगडाचा इतिहास जाणून घेण्याची माहिती
वनसंपदा आणि वन्यजीवांची माहिती
वाहतूक कोंडी, मधमाश्यांचा हल्ला किंवा अपघात झाल्यास अलर्ट संदेश
वणवा लागल्यास तत्काळ सूचना
पार्किंगची सविस्तर माहिती
वन विभाग दररोज गडावर प्रवेश देण्याची मर्यादा निश्चित करणार आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास अॅपद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. दिवसअखेर किती पर्यटकांनी गडावर प्रवेश केला याची अचूक नोंद वन अधिकाऱ्यांकडे असेल. अचानक गर्दी वाढल्यास गडाचा प्रवेश तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेता येईल.
ही नवी प्रणाली पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरणार असून, वन विभागालाही गर्दी व्यवस्थापनात मदत होईल. तसेच आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यास आणि निसर्गाचे रक्षण करण्यास यामुळे मदत होईल, असं वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी सांगितले. सिंहगडावरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे अॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.