मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की फिरायला बाहेर जाण्याचा अनेकांचा प्लॅन ठरलेला असतो. पण बऱ्याचदा खूप लांबचा प्लॅन करणं शक्य होत नाही. तेव्हा मित्रमैत्रिणींसोबत किंवा लहान मुलांसोबत जाण्यासाठी मुंबईच्या जवळचं एक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला नक्कीच भुरळ घालेल. निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात मुंबईचं विहंगम दृश्य सायन किल्ल्यावरून पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. याबाबतच आज आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
सायन किल्ल्याचा इतिहास
सायन किल्ला, ज्याला "सायन हिलॉक फोर्ट" म्हणूनही ओळखलं जातं, हा 17 व्या शतकात इंग्रजांनी बांधलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, 1669 ते 1677 दरम्यान, गव्हर्नर गेराल्ड ऑंगियर यांच्या कार्यकाळात हा किल्ला बांधण्यात आला. त्याकाळी हा किल्ला ब्रिटिशांच्या पारेल बेट आणि पोर्तुगीजांच्या सालसेट बेट यांच्यातील सीमारेषा दर्शविणारा होता. 1925 मध्ये या किल्ल्याला ग्रेड I वारसा संरचना म्हणून घोषित करण्यात आलं.
Maratha Tourism: शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?
निसर्गरम्य वातावरण आणि विहंगम दृश्य
सायन किल्ला हा सायनच्या टेकडीवर वसलेला आहे, इथून तुम्हाला मुंबईचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. किल्ल्याच्या परिसरात हिरवळ, शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवता येतं. किल्ल्याच्या पायथ्याशी पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आहे, इथे मुलांसाठी खेळण्याची सोय आहे. किल्ल्याच्या भिंतींवरून तुम्हाला शहरातील उंच इमारती, समुद्र आणि आसपासचं सौंदर्य पाहायला मिळतं.
भेट देण्याची योग्य वेळ
सायन किल्ला दररोज सकाळी 6:00 ते 12:00 आणि संध्याकाळी 4:00 ते 8:30 या वेळेत खुला असतो. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सायन रेल्वे स्थानकापासून फक्त 10-15 मिनिटांचा पायी प्रवास आहे.
किल्ल्यावर काय पाहावं?
1) ऐतिहासिक वास्तू: किल्ल्याच्या भिंती, चौकोनी खिडक्या आणि जुन्या काळातील तोफा पाहायला मिळतात.
2) विहंगम दृश्य: किल्ल्याच्या उंचीमुळे मुंबईचं सुंदर दृश्य अनुभवता येतं.
3) निसर्ग संपन्न परिसर: हिरवळ आणि शांतता यामुळे किल्ला निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे.
सायन किल्ला हे ठिकाण कुटुंबासोबत एक दिवस घालवण्यासाठी उत्तम आहे. इथे मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी शांतता आहे आणि तरुणांसाठी इतिहासाची ओळख आहे. किल्ल्याच्या परिसरात पिकनिकसाठी योग्य जागा आहे, जिथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवू शकता.