छत्रपती संभाजीनगर : जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यापैकी बरेच आजार आपल्याला माहितही नसतात. काही आजारावर इलाज नाही. आजार केवळ शारीरिकच नसतात, तर मानसिक आजारही बरेच आहेत, जे आपल्याला माहित नसतात किंवा ओळखता येत नाहीत. असाच एक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. बर्याच लोकांना या आजाराबद्दल माहितीही नसते. या विषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे मानसोपचार तज्ञ डॉक्टर किरण बोडखे यांनी.
advertisement
भ्रम, भ्रामक समजुती आणि कल्पनांमध्ये राहणे, त्यामुळे वास्तविकेशी संपर्क तुटणे. शंका, संशय घेणे, लोक आपल्या वाईटावर आहेत, असे वाटणे. स्वतःशी पुटपुटणे, हसणे, चिडचिडेपणा, अचानक हिंसक होणे, दचकून राहणे. भास होणे, असंबद्ध बडबड, इतरांमध्ये न मिसळणे, स्वतःकडे दुर्लक्ष, कमी बोलणे, प्रतिसाद न देणे, ही या आजाराची लक्षणे आहेत.
स्किझोफ्रेनिया हा आजार जादूटोणा, दैवीप्रकोप यामुळे होत नाही. तसंच हा आजार केवळ ताणतणाव वाढल्यामुळेच होतो हा गैरसमज आहे. मेंदूमधील रसायनांचा असमतोल आणि कार्य बिघडल्याने हा आजार होतो. त्यामुळे औषधोपचार घेणे गरजेचं आहे. औषध उपचाराने आजार नियंत्रणात ठेवता येतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार चालू ठेवावेत. मध्येच उपचार बंद केल्याने आजाराचे स्वरूप गंभीर बनत जाते. नंतर आजार औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे नियमित व दीर्घकालीन उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. औषधोपचारांसोबत कौटुंबिक आणि सामाजिक आधाराची खूप गरज असते. ही काळजी घेणे गरजेचे आहे.
विशीतल्या आणि तिशीतल्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषांना हा आजार होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.