डॉक्टरांच्या मते, टाइप 1.5 डायबिटीज हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यात टाइप 1 आणि टाइप 2 दोन्हीचे लक्षणे दिसून येतात आणि याचे योग्य निदान करणे कठीण असते. चला तर मग या वेगळ्या डायबिटीजची लक्षणे, कारणे आणि उपचार जाणून घेऊया.
टाइप 1.5 डायबिटीजची लक्षणं
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार टाइप 1.5 डायबिटीजला वैद्यकीय भाषेत लेटेंट ऑटोइम्यून डायबिटीज इन अडल्ट्स (LADA) असे म्हटले जाते. याची लक्षणे साधारणपणे 30 ते 50 वर्षांच्या दरम्यान दिसू लागतात. सुरुवातीला रुग्णांना जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणे, थकवा येणे आणि धूसर दिसणे अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे टाइप 2 डायबिटीजसारखी असल्याने अनेकदा डॉक्टरही सुरुवातीला याला टाइप 2 समजून उपचार सुरू करतात.
advertisement
टाइप 1.5 डायबिटीजची कारणे
LADA हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीर अशा अँटीबॉडीज तयार करते, ज्या पॅनक्रियाजमधील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींना हळूहळू नष्ट करतात. फरक इतकाच की टाइप 1 मध्ये ही प्रक्रिया खूप वेगाने होते आणि लहानपणी किंवा किशोरावस्थेतच दिसून येते, तर टाइप 1.5 मध्ये ही प्रक्रिया हळूहळू घडते. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीर थोड्याफार प्रमाणात इन्सुलिन तयार करत राहते, त्यामुळे अनेक महिने किंवा वर्षे इन्सुलिन इंजेक्शनची गरज भासत नाही. नंतर शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता भासते.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, टाइप 1.5 डायबिटीजचे अनेकदा चुकीचे निदान होते. कधी डॉक्टर याला टाइप 2 डायबिटीज समजतात, तर कधी टाइप 1 डायबिटीज मानतात. जेव्हा डाएट, एक्सरसाइज आणि मेटफॉर्मिनसारख्या औषधांनी शुगर कंट्रोल होत नाही, तेव्हा डॉक्टरांना शंका येते. अशा परिस्थितीत GAD Antibody Test केला जातो, ज्यामुळे शरीरात ऑटोइम्यून अँटीबॉडीज आहेत की नाही हे समजते. तसेच C-Peptide टेस्टद्वारे पॅनक्रियाज किती इन्सुलिन तयार करत आहे हे तपासले जाते. यानंतर टाइप 1.5 डायबिटीज असल्याचे स्पष्ट होते.
टाइप 1.5 डायबिटीजचे उपचार
उपचारांबाबत बोलायचे झाल्यास, LADA चे उपचार थोडे आव्हानात्मक असतात. सुरुवातीला काही रुग्णांना तोंडी औषधांनी फायदा होतो, पण हळूहळू पॅनक्रियाजची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होत जाते. अखेरीस इन्सुलिन घेणे आवश्यक ठरते. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की LADA मध्ये लवकर इन्सुलिन सुरू केल्यास पॅनक्रियाजमधील उरलेल्या पेशी जास्त काळ सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे टाइप 1.5 चा योग्य उपचार न झाल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
आता प्रश्न असा आहे की टाइप 1.5 डायबिटीजही धोकादायक असते का? हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास टाइप 1.5 डायबिटीजमुळे किडनी डॅमेज, डोळ्यांच्या समस्या, नर्व्ह डॅमेज आणि डायबिटिक कीटोअॅसिडोसिससारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे जर एखादी व्यक्ती सडपातळ असेल, कमी वयात डायबिटीज झाला असेल आणि औषधांनी शुगर कंट्रोल होत नसेल, तर तिने LADA ची तपासणी नक्की करून घ्यावी. योग्य ओळख आणि वेळेवर इन्सुलिन थेरपीमुळे या आजारावर चांगले नियंत्रण ठेवता येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
