वैज्ञानिकांच्या मते, तणावाच्या काळात शरीरात ‘कॉर्टिसॉल’ (Cortisol) नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात स्रवू लागतं. हे हार्मोन शरीराला सतत ‘अलर्ट’ ठेवतं आणि ऊर्जा टिकवण्यासाठी साखर व चरबी साठवण्याचं काम करतं. परिणामी शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू लागतं. विशेषतः पोटाजवळील भागात चरबी साचण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. हेच नंतर वजन वाढण्याचं आणि लठ्ठपणाचं प्रमुख कारण ठरतं.
advertisement
याशिवाय, तणावामुळे व्यक्तीच्या खाण्याच्या सवयी बदलतात. या अवस्थेत अनेकजण “इमोशनल ईटिंग” म्हणजेच भावनांच्या भरात अन्न सेवन करतात. गोड, तेलकट किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते कारण या अन्नातून तत्काळ ऊर्जा आणि अल्पकाळासाठी मानसिक शांतता मिळते. मात्र या अतिरिक्त कॅलरीज शरीरात साचत राहतात आणि वजन वाढवतात.
तणावाचा आणखी एक परिणाम म्हणजे झोपेचं कमी होणं. झोप न झाल्यास शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो आणि कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण घटतं. तसेच शारीरिक हालचाल कमी झाल्याने आणि थकवा वाढल्याने वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होतं. अशा प्रकारे मानसिक ताण शरीराच्या प्रत्येक प्रणालीवर परिणाम करत, हळूहळू लठ्ठपणाचं स्वरूप घेतो.
तज्ञांच्या मते, तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि पुरेशी झोप ही अत्यावश्यक आहेत. तसेच संतुलित आहार घेणं आणि वेळेवर जेवणं ही साधी पण प्रभावी पद्धती वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर शरीरही संतुलित राहतं. म्हणूनच तणाव कमी करणं हे केवळ मानसिक आरोग्यासाठीच नाही, तर वजन नियंत्रणासाठीही तितकंच गरजेचं आहे.