थायरॉईड ही आपल्या घशाच्या आत असलेली फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते. शरीरातला चयापचय, हृदयाचे ठोके आणि हॉर्मोन्स तयार होत असताना शरीरातल्या इतर क्रिया सुरळीत ठेवण्याचं काम ही ग्रंथी करते. थायरॉईड शरीरात हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. या ग्रंथीतून थायरॉक्झिन किंवा T-4 आणि Triiodothyronine T-3 ही दोन हॉर्मोन्स स्रवली जातात. ही हॉर्मोन्स शरीरासाठी खूप उपयोगी असतात. थायरॉईड हार्मोन्स शरीरात असंतुलित झाल्यास थायरॉईडची समस्या उद्भवते.
advertisement
थायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉइड. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही, ज्यामुळे थकवा, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, सतत थंडी वाजणे, केस गळणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, स्मरणशक्ती कमी होणे, श्वासोच्छ्वास समस्या, महिलांमध्ये गर्भधारणेच्या समस्या आणि अनियमित पाळी अशी लक्षणे दिसू शकतात.
हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड जास्त हार्मोन्सच्या तयार करतं, यामुळेदेखील समस्या उद्भवू शकतात. यामध्ये ग्रेव्हज रोग, ऑटोइम्यून विकार आणि थायरॉइड कॅन्सर यांचा समावेश आहे. हायपरथायरॉइडिझम औषधांच्या वापरामुळे आणि इतर कारणांमुळे होऊ शकतो, ज्यामुळे हाताला थरथर, उष्णता सहन न होणे, छातीत धडधड आणि जुलाब अशी लक्षणं दिसतात.
बहुतेक महिलांमध्ये थायरॉईड का वाढत आहे, याचं नेमकं कारण नवी मुंबईतील डॉक्टर आकाश अवधूत यांनी सांगितलं आहे.
डॉ. आकाश अवधूत म्हणाले, "भारतीय महिलांमध्ये थायरॉईड, पीसीओएस, लठ्ठपणा असे जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत आहेत कारण, भारतीय महिला आपल्या आरोग्याबाबत गंभीर नाही. त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात किंवा आरोग्याची काळजी घेण्याचा कंटाळा करतात. त्यांना जीवनशैलीत बदल करायचे नसतात. त्यांना फक्त तात्काळ उपाय हवा असतो"
"हे आजार टाळण्यासाठी तुम्हाला जीवनशैली बदलायला हवी, एक्सरसाइझ करायला हवी, हेल्दी खायला हवं", असा सल्ला डॉ. आकाश यांनी दिला आहे.
