एका अहवालानुसार, तरुणांमध्ये मान आणि पाठीच्या दुखण्याची प्रकरणे सुमारे 20% नी वाढली आहेत. आपण जेव्हा मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना मान खाली वाकवतो, तेव्हा मानेच्या स्नायूंवर 4.5 ते 27 किलोपर्यंत अतिरिक्त भार पडू शकतो. यामुळे मानेचे स्नायू ताणले जातात, ताठर होतात आणि हळूहळू हे दुखणे पाठीच्या आणि कंबरेच्या खालच्या भागापर्यंत पोहोचते.
advertisement
मान आणि कंबरेच्या दुखण्याची कारणे
चुकीची शारीरिक स्थिती: मोबाईल पाहताना किंवा लॅपटॉपवर काम करताना मान पुढे वाकवून किंवा खांदे झुकवून बसणे हे मुख्य कारण आहे. यामुळे मानेच्या आणि पाठीच्या कण्यावर अनावश्यक ताण येतो.
बैठ्या जीवनशैलीमुळे स्नायूंची ताठरता: बराच काळ एकाच स्थितीत बसल्यामुळे स्नायू आखडतात आणि शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो, ज्यामुळे कंबर आणि पाठ दुखते.
स्क्रीनची उंची: लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या स्तरावर नसणे. यामुळे वारंवार मान खाली वाकवावी लागते आणि 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' होतो.
प्रभावी उपाय
कामातून ब्रेक: दर 30 ते 45 मिनिटांनी कामातून उठून 2-5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. थोडे चाला किंवा साधे स्ट्रेचिंग व्यायाम करा.
योग्य आसन: खुर्चीत बसताना पाठ सरळ ठेवा, कंबर खुर्चीला टेकलेली असावी आणि लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या स्तरावर ठेवा. मोबाईल बघताना मान न वाकवता, फक्त नजर खाली झुकवा.
मानेचे आणि खांद्यांचे व्यायाम: मानेला गोलाकार फिरवणे, खांदे मागे-पुढे वळवणे यांसारखे साधे व्यायाम नियमित करा. यामुळे स्नायूंमधील ताण कमी होतो.
आरोग्य तज्ञांचा सल्ला: जर वेदना तीव्र असतील, हातांमध्ये मुंग्या येत असतील किंवा दुखणे सतत वाढत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित फिजिशियन किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
