छत्रपती संभाजीनगर शहरातील 'शिवसेना गणेश मंडळ मुलमची बाजारचा राजा' हे गणेश मंडळ अतिशय जूनं आहे. 1966मध्ये या गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. हे गणेश मंडळ दरवर्षी बाप्पाची पर्यावरण पूरक मूर्ती तयार करतं. मागच्या वर्षी या मंडळाने बडीशोपपासून बाप्पाची मूर्ती तयार केली होती. यावर्षी देखील या गणेश मंडळाने साबुदाण्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती उभी केली आहे. या गणेश मूर्तीची उंची 14 फूट आहे.
advertisement
मूर्तिकार आनंद जातेकर, गोविंदा जातेकर, अमन कंचनकर, स्वप्निल चौधरी, अनिकेत जातेकर यांनी मिळून ही मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 60 नग बांबू, 80 किलो साबुदाना, 50 नग पोती, 200 मीटर कापड आणि 35 किलो खाण्याचा डिंक या साहित्याचा वापर केला. 14 फूट उंचीची इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला. मूर्तीला घातलेले दागिने मंडळातील महिला सदस्यांनी तयार केलेले आहेत.
बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी बांबूचा बेस (पाया) तयार केला. मजबूत आणि टिकाऊ बांबू वापरून मूर्तीचा पाया बांधण्यात आला. याच बेसवर बाप्पाच्या शरीराचं पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात आलं. शरीराच्या स्ट्रक्चरवर पोती लावून मूर्तीला आवश्यक आकार व घनता देण्यात आली. पोत्यांवर कापडाचं आवरण लावून गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्यात आला. सर्वात शेवटी डिंकाच्या सहाय्याने साबुदाणा चिकटवण्यात आला.