मुसळधार पावसाचं कारण काय?
हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, कोकण, पुणे, नाशिक घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित राज्यातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
मध्यरात्रीपासून पावसाचा जोर
शनिवार उशिरा रात्रीपासूनच राज्यात पावसाची तीव्रता वाढली. संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि पालघर परिसरात पहाटेपासून मुसळधार सरी कोसळत असून, काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अंधेरी, सायन, दादर, कुर्ला परिसरात पाणीच पाणी
मुंबईत पावसाच्या संततधारेमुळे सकाळपासून अनेक ठिकाणी जलसंचय झाला आहे. अंधेरी, सायन, दादर, कुर्ला परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. लोकल सेवांवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाण्यातील काही भागांत नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.
मराठवाड्यात गंभीर परिस्थिती
मराठवाड्यात पावसामुळे शेतजमिनींवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे घरांच्या भिंतींना वेडे पडले आहेत, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रस्त्यांवरही पाणी पसरले आहे. काही भागांमध्ये लहान पूल आणि रस्ते वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पाऊस पुढील दोन दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. शेतकरी, प्रवासी आणि सामान्य नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहणे अत्यावश्यक आहे.