पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई शहरात ही घटना रात्री साडेवाठ वाजेच्या सुमारास घडली. अविनाश शंकर देवकर असं हत्या झालेला तरुणाचं नाव आहे. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार इथं अविनाश देवकर यांची हत्या करण्यात आली.
अविनाश देवकर हे दरबार हॉटेलमध्ये बसलेले होते. अचानक पाठीमागून येऊन अविनाश यांच्या डोक्यात अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, अविनाश देवकरला उभं राहण्याचीही संधी हल्लेखोरांनी दिली नाही. एकापाठोपाठ धारदार शस्त्राने सपासप वार करून देवकरला गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दरबार हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किती हल्लेखोर होते, याचीही माहिती अद्याप समोर आली नाही. अविनाश देवकर यांचा मृतदेह स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पुढील माहिती दिली जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
