सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी 8 जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये ४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पण, इतर ४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा इथं वेळागरयेथील समुद्र किनाऱ्यावर स्थानिका आणि बेळगाव येथील काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास काही पर्यटक हे समुद्रात पोहोण्यासाठी उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ८ ही पर्यटक बुडाले. स्थानिकांनी धाव घेऊन चार जणांना वाचवण्यात यश आलं.
advertisement
या चारही पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जण कुडाळचे तर काहीजण बेळगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे.
3 जणांचा मृत्यू
वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय इथं दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध सुरू आहे.
मृतांची नावं
१.फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
२.इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत)
३.नमीरा आफताब अख्तर वय 16, रा अल्लावर, बेळगाव (मयत)
बेपत्ता पर्यटकांची नावं
१. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय 36 रा. लोंढा, बेळगाव)
२. इक्वान इमरान कित्तूर (वय 15 रा. लोंढा, बेळगाव)
३.फरहान मोहम्मद मणियार (वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग)
४ जाकीर निसार मणियार (वय 13, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग)
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
4 पर्यटकांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटक जिल्हा आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येत असतात. त्यामुळे अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो. घटनेची माहिती घेण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. एकूण ८ जण होते. यापैकी ४ जणांना वाचवण्यात आलं आहे. ४ पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक मच्छिमार मदत करत आहे, घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
(सविस्तर बातमी लवकरच)