बीड जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ऊसतोड मजूर हे २०२४ मध्ये दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाले होते. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे याचा अहवाल तयार झाला आहे. या अहवालात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.
लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक ॲसिडची कमतरता, थॅलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्त्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३ हजार ४१५ एवढी आहे. यातील ७३ महिलांना तीव्र रक्तक्षय आहे. या सर्व महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.
advertisement
जिल्ह्यातील १ हजार ५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करतात. पोटात बाळ आणि हातात कोयता, असा संघर्ष त्यांचा होता. या सर्व महिलांची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर झाली आहे.
ऊसतोडीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील ८४३ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यात २७९ शस्त्रक्रिया खासगीत केल्या. तत्पूर्वी नियमानुसार सरकारी डॉक्टरांची परवानगी घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यातही ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतूसंसर्ग, पोटात दुखणे अशी लक्षणे या महिलांना असल्याचे माता व बाल संगोपन अधिकारी यांनी सांगितले.
