पुढील ३-४ दिवस महत्त्वाचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या थंडीचा प्रभाव संमिश्र आहे. पुढील २४ तासांनंतर राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. जरी तापमानात वाढ होणार असली, तरी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीचा गारठा कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.
advertisement
हवामान तज्ज्ञ डॉ. तृषाणू बनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ संभवते. विदर्भ-मराठवाड्यात ढगाळ वातावरण निवळल्यानंतर थंडीचा कडाका पुन्हा जाणवेल. मुंबई-कोकणात मात्र हवेतील आर्द्रता वाढल्याने काहीसा उकाडा जाणवू शकतो, पण पहाटे गारवा राहील. उत्तर भारतातून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे १९ जानेवारीनंतर महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केरळ आणि कर्नाटकाच्या समुद्र किनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे समुद्र खवळला असून मासेमारी करणाऱ्यांनी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. या बदलाचा परिणाम कोकणात दिसून येणार आहे. कोकणातील हवामानात मोठे बदल होऊ शकतात. सोसाट्याचा वारा आणि ढगाळ हवामान राहणार आहे. थंडी हळूहळू कमी होणार आणि उकाडा वाढणार आहे.
उत्तर भारताचा राज्यावर परिणाम
सध्या उत्तर भारतात, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात थंडीची लाट आहे. अनेक ठिकाणी विजिबिलिटी ५० मीटरच्या खाली गेली आहे. या बदलत्या हवामान प्रणालीचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, यामुळे थंडीत तात्पुरती घट झाली होती.
शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना
हवामान बदलामुळे रब्बी पिकांवर, विशेषतः गहू आणि हरभऱ्यावर दव पडण्याची शक्यता आहे. तापमानातील या चढ-उतारामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वाढत्या थंडीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे रात्री आणि पहाटे घराबाहेर पडताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
