नालासोपारा पूर्व धानीव बाग येथील शाहीन क्लिनिक येथे डॉ. जबीउल्ला खान (BAMS) बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली 8 डिसेंबर रोजी डमी रुग्ण पाठवण्यात आला. तपासादरम्यान डॉ. खान हा स्त्रीरोगतज्ञ नसतानाही फक्त 1500 रुपयात गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले.यावेळी ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाही आढळून आला. त्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318, तसेच MTP Act कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती CMO डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.
advertisement
आणखी एक धडक कारवाई, सोनोग्राफी मशीन सील
ईश्वर्या हेल्थकेअरवर धाड टाकत पालिकेने सोनोग्राफी मशीन सील केले आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसईतील ईश्वर्या हेल्थकेअर प्रा. लि. या सोनोग्राफी केंद्रावरही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच समुचित प्राधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या निर्देशानुसार केलेल्या तपासात केंद्रधारक कायद्याच्या अनेक तरतूदींचा भंग करत असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर 1 डिसेंबर 2025 रोजी केंद्रातील सोनोग्राफी मशीन आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोग्य विभागाने या केंद्राविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
बेकायदेशीर केंद्रांवर मोठी मोहीम सुरू, पालिकेचा इशारा
वसई-विरार महापालिकेने स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात आणि नियमभंग करणाऱ्या केंद्रांवर सतत धडक कारवाया सुरू राहतील.नागरिकांना अशा केंद्रांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सलग कारवायांमुळे नालासोपारा–वसई परिसरातील बेकायदेशीर आरोग्य केंद्रांचा पर्दाफाश होत असून, पालिकेच्या तडाखेबंद भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
