बारावीनंतर कोणत्याही कामाची लाज न बाळगता सहा वर्षे चहाच्या हॉटेलवर काम केलेल्या बंडु ढवळे यांनी नंतर स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला. जामखेड-नगर रस्त्यालगत एका वडाच्या झाडाखाली दोन बाकडे आणि काही खुर्च्या टाकून त्यांनी चहाचे दुकान सुरू केले. त्यांच्या चहाच्या चवीमुळे सर्वसामान्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेक पण त्यांच्या दुकानाला भेट देऊ लागले. त्यामुळे अल्पावधीत त्यांचे दुकान 'पुढारी वड' म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
बंडु ढवळे यांच्या पत्नी राधिका यांनी शेती पाहत पाहत मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. थोरला मुलगा प्रदीपने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नेट परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. त्याने साडे-पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करून आता डॉक्टर पदवी मिळवली आहे.
दुसरा मुलगा रोहित सध्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. दोन्ही मुलांनी अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण देऊन यशाला गवसणी घातली आहे. शिकताना त्यांची आबाळ झाली, शिकविण्याची आमची परिस्थिती नव्हती, मात्र आमची मुलं हुशार होती. पहिल्यापासून त्यांच्यात जिद्द अतिशय ठासून भरली होती. परिश्रम करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पोरांनी आमचे पांग फेडले, अशा भावना प्रकाश उर्फ बंडु ढवळे यांनी बोलून दाखवल्या.
