या निर्णयाचा पहिला परिणाम पाहायला मिळाला तो अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीमध्ये. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा अक्षय राऊत यांच्याविरुद्ध १७ पैकी १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
सध्या कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची सत्ता आहे. मात्र, नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून मनमानी कारभाराचे आरोप आहेत. शासनाच्या नियमांचे पालन न करता घेतले जाणारे निर्णय, तसेच आरोग्य, शिक्षण व सांडपाणी व्यवस्थेसारख्या मूलभूत सुविधा नीट न पुरविल्यामुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नगरसेवकांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी अखेर अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नगर परिषदेचे अध्यक्ष हटविण्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत.
