श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांच्याविरोधात नागवडे यांच्या पत्नीने निवडणूक लढवली होती. तसेच राहुल जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. नागवडे आणि जगतापांचा पराभव झाल्यानंतर आता पाचपुतेंची कोंडी करण्यासाठी दोघांनीही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने श्रीगोंद्याचे राजकारण पूर्णपणे बदलून जाणार आहे.
पाचपुतेंच्या विरोधकांकडून अजितदादांना बळ
नागवडे आणि जगताप यांचे राजकारण पाचपुतेविरोधी राहिलेले आहे. नागवडे-जगताप यांच्यात जरी फारसे सख्य नसले तरी आता पाचपुते यांना घेरण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर त्यांची कोंडी करण्यासाठी अजित पवार यांनी दोन्ही नेत्यांना बळ देण्याचे ठरवले आहे. तुम्ही फक्त चांगले काम करा, श्रीगोंद्यातील विकासकामांना झुकते माप देईल, असा शब्दच अजित पवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.
advertisement
कोण आहेत राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप?
कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाला श्रीगोंदा मतदारसंघातील जाग ना सुटल्याने अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे दोघेही अजित पवार गटाचे यापूर्वी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत.
राहुल जगताप हे एकसंध राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले आहेत. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचपुते यांना पराभूत करून विधानसभेत पाऊल ठेवले होते. त्यांचाही सहकार चळवळीशी संबंध आहे.
भाजप विरोधातील नेत्यांना अजितदादांकडून बळ?
भाजप आमदारांकडून पराभूत झालेल्या विरोधकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ताकद देत असल्याची तक्रार भाजपच्याच आमदारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. अजित पवार यांच्या पक्षातील गेल्या काही दिवसांतील पक्षप्रवेश पाहता भाजप आमदारांकडून पराभूत झालेले नेते मनगटावर घड्याळ बांधत असल्याचे चित्र आहे. हेच लक्षात घेऊन भाजप आमदारांनी अजित पवार हे ठरवून भाजपविरोधातील स्थानिक नेत्यांना बळ देत असल्याचा सूर अमित शाह यांच्याजवळ आळवला.
