अहमदनगर, 7 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळपिंप्री गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस आणि नागरिकांमुळे या कुटुंबाचा जीव वाचला आहे, पण घाबरलेलं कुटुंब अजूनही पोलीस ठाण्यात आश्रयाला आहे.
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून दोन कुटुंबावर चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलवरही मारहाण झाली होती, पण ते प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आलं होतं, मात्र एका ग्रामपंचायत सदस्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने काही पोलीस घटनास्थळी होते त्यांनी रक्षण केल्याने कुटुंबियांचा जीव वाचला.
advertisement
या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. संतप्त झालेल्या 400 ते 500 लोकांच्या जमावाने घराची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात 71 जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या हल्ल्यामुळे कुटुंबाने रात्रीपासून लोणी पोलीस स्टेशनचा आसरा घेतला असून लहान मुलाबाळांसह सर्वजण घाबरले आहेत. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.
