पारनेर शहरात पारनेर-सुपा रस्त्यालगत या देवस्थानची तब्बल 36 एकर जमीन आहे. देवस्थानच्या जागेवर युवराज कुंडलीक पठारे, नामदेव पठारे, बाळासाहेब पठारे आणि इतरांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण काढावे म्हणून सन 2018 मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होउन न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारनेर नगरपंचायतकडे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमणधारकांना या नोटीस बजाण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर पारनेरच्या न्यायालयात युवराज पठारे याची भेट झाली त्यावेळी त्याने आपणास भेटून यात पडू नकोस नाहीतर तुला जीवे मारून अशी धमकी दिली होती.
advertisement
यापूर्वी धमकी दिली होती सात दिवसांची नोटीस देण्यात येऊनही अतिक्रमण न काढल्याने गुरूवार २६ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सचिव सुधीर देवीदास पाठक यांच्या सांगण्यावरून सुनील चौधरी हे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे गेले होते. शिपाई यांच्या दालनामध्ये अतिक्रमणासंदर्भात चर्चा सुरू असताना युवराज पठारे आणि इतर दोन इसम तिथे आले. तुझा इथे येण्याचा काय संबंध ? तू यामध्ये पडू नको नाहीतर मी तुला जीवे मारील अशी धमकी मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमोर दिली.
युवराज पठारे याच्या धमकीनंतर सुनिल चौधरी याने मी देवस्थानचा ट्रस्टी आहे असे सांगतिले. त्यानंतर मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमक्ष मी याला आता उचलून घेऊन जाणार आहे, त्याला तिकडेच मारून टाकतो, आज याचा विषय संपवितो अशी धमकी देत युवराज याने सुनिल याची कॉलकर पकडली. तर इतर दोघांनी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसमक्ष उचलून कार्यालयाबाहेर आणले. सुनिल चौधरी यास कार्यालयाबाहेर आणल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या काळया रंगाच्या थार जीपमध्ये बसविण्यात आले. त्याला युवराज पठारेसह इतरांनी जीपमध्येच मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जीप युवराज पठारे याच्या घराकडे नेण्यास चालकाला सांगण्यात आले. पठारे यांच्या घरी गेल्यानंतर एका खोलीत कोंडून मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. जवळचा मोबाईल काढून पोलीसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता युवराज याने मोबाईल हिसकावून घेतला.
आता तुला आणि तुझ्या भावालाही संपवतो, आरोपीचा दम
मोटारसायकलची चावी, पैशांचे पाकीटही काढून घेण्यात येऊन युवराज कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत उर्फ आबा कुंडलिक पठारे, चुलते बाळासाहेब पठारे, युवराजचे वडील कुंडलिक पठारे व युवराजची पत्नी व इतर सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पठारे याने तुझा वकील भाऊ उन्मेश हा आमच्या विरोधात कोर्टात केसेस लढतो आता तुला आणि तुझ्या भावालाही संपवतो असा दम दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
युवराज पठारेला अटक
सुनील चौधरी यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून मुख्य आरोपी नगरसेवक युवराज पठारे याला अटक केली आहे.
