लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. यामध्ये जवळपास १० उमेदवारांचा जवळपास समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशीची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर १८ % जीएसटी भरावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. चाळीस मतदान केंद्रासाठी 21 लाख रुपये शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली. अमहदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंकेंना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीचा लढत झाली. सुजय विखे पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्याविरोधात २ लाख ८१ हजार मतांनी विजय मिळवला होता.