ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. नगरमधील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ एका खोलीत हा रक्तरंजित थरार घडला. जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश माणि भेटे असं हल्लेखोराचं नाव असून तो अहिल्यानगरमधी ढवण वस्ती परिसरात राहतो. तर पीडित मुलगी सावेडी उपनगरातील एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हा इस्कॉन मंदिराजवळ भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता. त्याने शनिवारी सकाळी दुचाकीवर बसवून युवतीला त्याच्या खोलीत नेले. तेथेच तिच्यावर चाकूहल्ला केला. यावेळी पीडितेनं केलेला आरडाओरड ऐकून शेजारच्याच खोलीत राहणाऱ्या एका व्यक्तीने खिडकीतून पाहिले. तेव्हा महेश युवतीच्या गळ्यात चाकू खुपसत होता. त्याने खोलीचे दार लाथा मारून उघडले. तितक्यात युवतीने तेथून पळ काढला. पण हल्लेखोर तिच्यामागे चाकू घेऊन धावला. पण घटनास्थळी आसपासचे लोक जमा झाल्याने आरोपीनं तिथून पळ काढला.
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नातलगांनी तिला खासगी रुग्णालयात हलवले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची चौकशी केली. हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून पत्नी व सासऱ्याच्या खूनप्रकरणी त्याला अटक झाली होती. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. यानंतर त्याने एका १५ वर्षांच्या मुलीवर चाकू हल्ला केला आहे.