साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निघोज गावातील माजी सैनिकाच्या कुटुंबावर गावातील काही गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यार, हॉकी स्टिक, स्टील रॉड आणि खोऱ्याच्या दांड्याने माजी सैनिकाला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत माजी सैनिकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. तर पत्नीचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे.
advertisement
सत्यवान नारायण लंके असं मारहाण झालेल्या माजी सैनिकाचं नाव आहे. ते मराठा रेजिमेंटमध्ये जवान म्हणून काम करत होते. या हल्ल्याचा त्रिदल माजी सैनिक सेवा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची माहिती देण्यात आली आहे.
माजी सैनिकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर, पत्नीलाही मारहाण
माजी सैनिक सत्यवान नारायण लंके यांच्यावर गावातील काही गावगुंडांनी बुधवारी प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण हत्यार, हॉकी स्टिक, स्टील रॉड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत लंके यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हात फ्रॅक्चर झाले. दरम्यान, लंके यांच्या पत्नी सीमा लंके मदतीला गेल्या असता त्यांनाही गावगुंडांनी जबर मारहाण केली. यात त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमी दोघेही सध्या शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) व कलम १०९चा समावेश करण्यात आलेला नाही, अशी तक्रार संघटनेकडून करण्यात आली. त्रिदल माजी सैनिक सेवा संघटनेने प्रशासनास तातडीने कठोर कारवाई करून आरोपींवर जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.